बिहारमधील मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांचे महत्वपूर्ण वक्तव्य


नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवेसनेसोबत युती करुन निवडणूक लढवल्यानंतरही मुख्यमंत्रीपदासाठी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून राहिल्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता काबिज करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले होते. आता बिहारमध्ये याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने विशेष काळजी घेतली असून ‘जर-तर’चा प्रश्न बिहारमध्ये असणार नाही. भाजपच्या जास्त जागा जदयूपेक्षा आल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार अशी जाहीर घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी सीएनएन-न्यूज १८ या वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. या ठिकाणी ‘जर-तर’ मुख्यमंत्रीपदासाठी असणार नाही. नितीशकुमार हेच बिहारमध्ये पुढील मुख्यमंत्री असतील, आम्ही सार्वजनिकरित्या याची घोषणा केली आहे आणि याला आम्ही बांधील आहोत. भाजपने जरी जदयूपेक्षा जास्त जागा मिळवल्या तरीही, नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे, अमित शहा यांनी म्हटले आहे.

डबल इंजिनचे सरकार बिहारच्या लोकांना मिळणार आहे. एक राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली. अमित शहा लोकजनशक्ती पार्टीच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर म्हणाले, आम्ही पुरेशा जागा लोजपाला दिल्या होत्या, तरी देखील ते बाहेर पडले. हा त्यांचा निर्णय आहे आमचा नाही.

शुक्रवारी जदयूवर टीका करताना लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी जदयूला मतदान करणे म्हणजे राज्याला मागे घेऊन जाणे ठरेल, असे म्हटले होते. लोजपाच्या उमेदवारांची दुसरी यादी ट्विटरवरुन त्यांनी जाहीर केली. तसेच जर लोजपा सत्तेत आली तर ‘प्रथम बिहार, प्रथम बिहारी’ हे व्हिजन डॉक्युमेंटचा अवलंब करु अशी घोषणा केली. अमित शहा यांचे कौतुक करताना चिराग यांनी त्यांना पंतप्रधान मोदींचे हनुमान असे संबोधले होते. पण त्यावरुन भाजपने त्यांना कुठल्याही भ्रमात न राहण्याचा सल्ला दिला आहे.