खडसेंच्या सीमोल्लंघनावर अजित पवारांनी जोडले हात


मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. पण त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत अद्याप तर्क-वितर्क लढविले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी चक्क हात जोडून पत्रकारांना नमस्कार करत नेहमीप्रमाणे आपणास याबद्दल काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची एकनाथ खडसेंनी भेट घेतल्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चांना आणखी उधाण आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी दाखल झाले होते. त्यावेळी रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. कोणत्या कारणसाठी ही भेट झाली, याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे विश्रामगृहावरून एकाच गाडीने घटनास्थळी निघाल्यामुळे पुन्हा एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत तर्क-वितर्क सुरु झाले होते.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी पत्रकारांसमोर चक्क हात जोडले. तसेच, याबद्दल मला काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसे काय सांगणार? असा प्रतिप्रश्नही अजित पवार यांनी केल्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकला.