स्वप्नातला शर्ट प्रत्यक्षात

कपडे धुणे. वाळविणे आणि नंतर त्याला इस्त्री मारणे ही कामे मनापासून आवडणारी व्यक्ती गुलबकावलीच्या फुलाइतकीच दुर्मिळ असेल यात कांही शंकाच नाही. तर्ह तर्हे चे कपडे घालण्याचा शौक माणसाला आदिकाळापासून असला तरी असे कपडे आयते हातात मिळाले तरच ते वापरण्यात खरे सुख असते हेही तितकेच खरे. असा एखादा शर्ट आपल्याला मिळाला तर आपली प्रतिक्रिया नक्की काय असेल बरे?

अमेरिकन कंपनी वुल अॅन्ड प्रिन्स यांनी माणसाची ही इच्छा प्रत्यक्षात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून न चुरगळणारा, अति व्यायाम केल्यानंतरही घामाचा वास न लागणारा, सतत फ्रेश दिसणारा आणि १०० दिवस दररोज वापरूनही स्वच्छ दिसणारा शर्ट त्यांनी तयार केला आहे. या शर्टला दररोज वापरले तरी धुण्याची आवश्यकता भासत नाही तसेच इस्त्रीही करावी लागत नाही असा कंपनीचा दावा आहे.

कंपनीचे संस्थापक मॅक बिशप सांगतात तुम्ही हा शर्ट सतत वापरला तरी तो ताजेपणाचा अनुभव देतो. हा शर्ट तयार करण्यासाठी वुलन ब्लेंडचा वापर केला असून आधुनिक वॉर्डरोबसाठी हा शर्ट परफेक्ट आहे. कंपनीने या शर्टच्या चाचण्या घेण्यासाठी काही माणसे पगारी नेमली होती आणि या सर्वांनीच शर्ट कंपनीच्या दाव्यांना खरा उतरल्याचा रिपोर्ट दिला आहे.

सुती कपड्यांपेक्षा वुलन सहापट टिकावू आहे आणि न चुरगळणे हा तिचा नैसर्गिक गुणधर्म आहे तसेच ती वासालाही प्रतिबंध करणारी आहे. यामुळे या शर्टसाठी वुलन ब्लेंडचा वापर केल्याचे मार्क यांचे म्हणणे आहे. स्वतः मार्क हा शर्ट घालून रस्त्यातील लोकांशी संभाषण करत असल्याचा व्हिडीओ कंपनीने रिलीज केला आहे. नागरिकांकडून या शर्टला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे असे मार्क यांचे म्हणणे आहे. या शर्टची किंमत ९८ डॉलर्स इतकी आहे आणि तो ऑक्सफर्ड सॉलिड ब्ल्यू लाईन, चौकट डिझाईनमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment