प्रदूषणामुळे जीवनमानात घट

वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या एमआयटी या संस्थेतील संशोधकांनी चीनमध्ये केलेल्या एका पाहणीत कोळशामुळे होणार्‍या प्रदूषणामुळे आयुष्यमान घटते असे आढळून आले आहे. कोळसा जाळल्यामुळे त्याचे जे अंश हवेत सोडले जातात ते लोकांच्या श्‍वसनातून त्यांच्या श्‍वसनसंस्थेत जातात आणि परिणामी त्यांना दम्यासारखे रोग जडतात आणि आयुष्यमान कमी होऊन लवकर मृत्यू येतो असे या पाहणीत दिसून आले आहे. भारतातसुध्दा वीज निर्मिती वाढविण्यासाठी औष्णिक वीज केंद्रांची संख्या वाढविली जात आहे. त्यामुळे चीनमधल्या या पाहणीचा निष्कर्ष भारतासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

एमआयटी या संस्थेने चीनमधल्या उत्तर भागातील हुआई नदीच्या परिसरात राहणार्‍या ५० कोटी लोकांना डोळ्यासमोर ठेवून एक पाहणी केली तेव्हा या परिसरातील लोकांचे आयुष्यमान घटले असल्याचे लक्षात आले. कोळसा प्रचंड प्रमाणावर जाळला गेला तर त्याचे काही अंश हवेत किती प्रमाणात मिसळले जातात याची अनेक निरीक्षणे करण्यात आली. तेव्हा असे दिसून आले की दर घनमीटर हवेमध्ये १०० मायक्रोगॅ्रम एवढे कोळशाच्या धुळीचे कण मिसळले गेले तर त्या हवेत श्‍वास घेणार्‍या व्यक्तीचे आयुष्य तीन वर्षांनी कमी होते.

चीनमध्ये वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शिवाय या परिसरात कडाक्याची थंडी असल्यामुळे कामगारांच्या वसाहतीत हवा गरम राहण्यासाठी कोळशावर चालणारे बॉयलर पेटवले जाते. तेथे विशेषतः हुआई नदीच्या काठावर असे बॉयलर मोठ्या प्रमाणावर वापरले जात असतात. त्याच्या परिणामांचा १९९१ ते २००० या दशकातला अभ्यास करण्यात आला तेव्हा असा निष्कर्ष हाती पडला. अर्थात या निष्कर्षाचा तिथल्या सरकारवर काय परिणाम होतो आणि सरकारची धोरणे बदलतात की नाही याबाबत कोणी काही सांगू शकत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment