तणावमुक्तीसाठी आहार

न्यूयॉर्क – मानवी जीवनातली स्पर्धा वाढत चालल्यामुळे तणाव वाढत आहेत. मात्र तणाव निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरातल्या काही हार्मोन्सचे संतुलन नष्ट होते. ते संतुलन साधण्यासाठी औषधे दिली जातात आणि त्या औषधांनी संतुलन साध्य झाले की, तणाव काही वेळा पुरता का होईना पण कमी होतो. त्यामुळे तणावावर औषधे आहेत ही गोष्ट आता सर्वांना माहीत झालेली आहे. परंतु काही विशिष्ट आहार घेतल्यानंतर तणाव कमी होतो हे आजवर माहीत नव्हते. आता शास्त्रज्ञांना तसे आढळले आहे.

या संबंधात केलेल्या एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, काही विशिष्ट प्रकारची काळजी लागली की, आधी झोप कमी होते आणि झोप कमी झाल्यामुळे किंवा विस्कळीत झाल्यामुळे तणाव वाढतो. तेव्हा चांगली झोप लागण्यासाठी प्रयत्न केले तर तणावावर विजय मिळविता येतो. म्हणजे तणाव कमी होण्यासाठी चांगली झोप लागेल असा आहार घ्यावा. याचाच अर्थ असा की, काही विशिष्ट आहार घेतला की, तणाव कमी होतो. या दृष्टीने शास्त्रज्ञांनी काही शिङ्गारशी केल्या आहेत.

ज्या अन्नामध्ये मॅग्नेशियमची पुरवठा क्षमता आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतले पाहिजे. २००६ साली या संबंधात झालेल्या एका संशोधनामध्ये ही गोष्ट आढळली आहे. हिरव्या गर्द रंगाच्या पालेभाज्या आणि द्विदल भाज्या यामधून मॅग्नेशियम चांगले मिळू शकते. परिणामी झोप चांगली लागून तणाव कमी होतो. पोटॅशियम हा सुद्धा एक निर्णायक घटक आहे. ज्यांना शांत झोप लागत नाही आणि ती सारखी चाळवली जाते त्यांनी पालेभाज्या आणि भाजलेले बटाटे खाल्ले तर त्यांना पोटॅशियम भरपूर मिळते आणि झोप चांगली लागते.

ड जीवनसत्व हा सुद्धा असाच एक महत्वाचा घटक आहे. ज्या लोकांना रात्री चांगली झोप लागत नाही पण त्यामुळे दिवसा मात्र सारखे झोपावेसे वाटते त्या लोकांना ड जीवनसत्व भरपूर मिळाले तर रात्रीची झोप छान मिळते आणि तणाव कमी होतो. ड जीवनसत्व कशातून मिळते याची माहिती सर्वांना आहेच. परंतु सूर्यकिरणे हा ड जीवनसत्वाचा पुरवठा करणारा सर्वात स्वस्त स्रोत आहे हे विसरता कामा नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment