खाद्य तेलात बदल करा; तज्ज्ञांचा सल्ला

oilनवी दिल्ली : भारतातले लोक वरचेवर लठ्ठ होत चालले आहेत. भारत हा तरुण देश आहे आणि या देशाची साठ टक्के जनता तरुण आहे. परंतु या तरुणांमध्येच शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रकार आढळत असून त्यामुळे तज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातल्या या तरुणांमध्ये २० ते २९ या वयोगटात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे. या वयोगटातील दर पाच जणांपैकी दोघांचे वजन जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यात उच्च रक्तदाब आणि हृदयविकार बळावण्याची भीती आहे. हे कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर करावयाचा उपाय मात्र सोपा आहे.

काही डॉक्टरांनी कोलेस्टेरॉल जास्त असलेल्यांच्या कुटुंबांना एक सोपा उपाय सुचविला आहे. त्यांनी वापरात असलेले खाद्य तेल दर महिन्याला बदलावे असा हा उपाय आहे. एका महिन्यात शेंगदाण्याचे तेल वापरत असू तर त्याच्या पुढच्या महिन्यात करडीचे तेल वापरावे आणि तिसर्‍या महिन्यात सूर्यफुलाचे तेल वापरावे. त्या पाठोपाठ पुन्हा पहिली तेले न वापरता कधी सोयाबीनचे कधी सरकीचे तर कधी पाम ऑईल वापरावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या हृदयविकार संशोधन यंत्रणेत काम करणार्‍या तज्ज्ञांनी हा उपाय शोधून काढला आहे. कोलेस्टेरॉल हे चरबीचेच एक रुप असून ते रक्तामध्ये जमा होत असते आणि त्याचा अतिरेक झाला की ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला चिकटते. असे त्याचे थर वाढत गेले की ते रक्तप्रवाहाच्या आडवे येतात आणि रक्तप्रवाह बंद होऊन हृदय बंद पडू शकते. मात्र एवढ्या मोठ्या धोक्यावर हा सोपा उपाय आहे. लोकांनी जरुर अवलंबून पहायला पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment