सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अफवा पसरवणारा जेरबंद

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी खोट्या बातम्या फैलावून अफवा पसरविणाऱ्या दिल्लीतील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी जेरबंद केले आहे. वकील असण्याचा दावा करणाऱ्या या विभोर आनंद नामक व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट समाजमाध्यमांच्या नियमांचा उल्लंघन केल्याबद्दल बंद करण्यात आले आहे.

आनंद याने सुशांतसिंह याच्यासह त्याची व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमाद्वारे अनेक खळबळजनक आणि अपमानकारक अफवा पसरविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दोघांच्याही मृत्यूबाबत आनंद याने खोट्या बाबी समाजमाध्यमाद्वारे अनेकांपर्यंत पोहोचविल्या आहेत, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.

आनंद याला दिल्ली येथे अटक करून मुंबई पोलिसांनी मुंबईत आणले आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याने सुशांत, दिशा यांच्यासह अनेकांवर खोटे आरोप केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दिशा सालियान हिची हत्या करण्यात आली असून त्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यामागे बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्तींचा हात असल्याचा आरोप आनंद याने समाजमाध्यमाद्वारे केला आहे. दिशा हीचा दि. ८ जून रोजी मुंबईतील एका निवासी इमारतीच्या १४ च्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.