मी तर पंतप्रधानांचा हनुमान: चिराग पासवान

विधानसभा निवडणुकांमध्ये लोकजनशक्ती पक्षाने भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली असली तरीही पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हनुमान’ असल्याचे खाजगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे. बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली भाजप आणि लोकजनशक्ती पक्षाचे सरकार यावे, अशी आपली इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पासवान यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र ठेवल्यावरून सुरू झालेल्या वादाबाबत ते बोलत होते. ‘मी नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होतो. आजही आहे आणि उद्याही राहीन, असे पासवान यांनी सांगितले. मला मोदी यांचे केवळ छायाचित्र लावण्याची गरज नाही. मोदी माझ्या काळजात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. माझे काळीज चिरून बघा, त्यात तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतील, असे पासवान म्हणाले.

जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निक्षण साधताना पासवान म्हणाले की, मला पंतप्रधानांच्या छायाचित्राची गरज नाही. ती नितीशकुमार यांना जास्त आहे. एकीकडे पंतप्रधानांच्या कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, सुधारित नागरिकत्व कायदा अशा मुद्द्यांवर पंतप्रधानांना विरोध केल्यानंतर त्यांच्याबद्दल निष्ठा दाखविण्यासाठी नितीशकुमार यांनाच त्यांच्या छायाचित्राची गरज आहे. आपण यापूर्वीही भाजपबरोबर होतो आणि यापुढेही राहू, असे पासवान यांनी सांगितले. बिहारमध्ये भाजप आणि लोकजनशक्ती पक्षाचे संयुक्त ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन करणे हा आपला संल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.