.. तर मुंबई पोलीस करतील विवेक ओबेरॉयची चौकशी: अनिल देशमुख

मुंबई: बॉलिवूडच्या ‘ड्रग्ज कनेक्शन’ प्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता विवेक ओबेरॉय याची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस त्याची चौकशी करतील, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक मानला जात असून मोदींवरील जीवनपटामध्ये त्याने प्रमुख भूमिका निभावली आहे.

विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य सिल्वा याचा कर्नाटकच्या चित्रपट सृष्टीतील अंमली पदार्थ कनेक्शन प्रकरणी शोध घेण्यासाठी बंगळुरू पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली होती. आदित्य हा सातत्याने कर्नाटक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब राहिला आहे.

केवळ आदित्य याचा शोध घेण्यासाठी विवेकाच्या घराची झडती न घेता ‘ड्रग्ज रॅकेट’मध्ये त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे का, याचा तपास ‘एनसीबी’ने करावा. जर ‘एनसीबी’ने असा तपास केला नाही तर आपण मुंबई पोलिसांकडून हा तपास करून घेऊ, असे देशमुख यांनी सांगितले. काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने देशमुख यांची भेट घेऊन विवेकच्या चौकशीची मागणी केली. त्यावेळी देशमुख यांनी हे आश्वासन दिले.

कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आणि विवेकाची पत्नी प्रियंका यांचा भाऊ आदित्य याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने विवेकच्या घराची तपासणी केली होती. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रियंका यांनाही बंगळुरू पोलिसांनी नोटीस बजावली आहे.