वणीची सप्तश्रृंगी माता- अर्धे शक्तीपीठ

saptshrungi
साडेतीन प्रमुख शक्तीपीठातील अर्धे पाठी मानली गेलेली सप्तश्रृंगी नाशिक जिल्हातील वणी येथे आहे. सप्तश्रृंगी निवासिनी, सप्तश्रृंगी माता, ब्रह्मस्वरूपिणी अशा अनेक नावांनी ती ओळखली जाते. सप्तश्रृंग याचा अर्थच मुळी सात डोंगरशिखरे असा आहे. सह्याद्री पर्वतरांगातील सात शिखरांमध्ये या महामायेची स्थान आहे. देशातील ५१ शक्तीपीठापैंकी एक असलेले हे स्थान देवी भागवत पुराणातही उल्लेखले गेले आहे.

सतीचा अग्नीत दग्ध झालेला देह घेऊन जेव्हा महादेव वणवण भटकत होते तेव्हा त्यातील उजवा हात या गडावर पडल्याचे मानले जाते. तसेच ओंकारातील आकार, उकार व मकार म्हणजे तीन शक्तीपीठे तर मकार (अर्ध मंत्र) म्हणजे सप्तश्रृंगीचे स्थान असे मानले जाते. महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर युद्ध करून दमलेली दुर्गा या गडावर विश्रांतीसाठी आली असा समज आहे. देवीने ठार केलेल्या महिशासूराचे मस्तक म्हणजे रेड्याचे मुख मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याच्या पायाशीच दगडात कोरले गेलेले आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून ही देवी उदयास आली आणि तिने दुर्गेचा अवतार घेतला असे उल्लेख पुराणात आढळतात व त्यावरून तिला ब्रह्मस्वरूपिणी म्हणूनही ओळखले जाते.

देवीचे गडावरील मंदिर दुमजली असून देवी दुसर्‍या मजल्यावरच आहे. ८ फूट उंचीच्या या मूर्तीला अठरा हात आहेत आणि त्यात विविध शस्त्रे आहेत. त्रिशूल, सुदर्शन, शंख, धनुष्यबाण, वज्र, घंटा, अग्नी ज्वाला, दंड, अक्षमाळा, कमंडलू, सूर्यकिरणे, तलवार, ढाल, परशु, पानपत्र, कणीस, कमळ, पाश तिच्या हातात आहेत. मूर्ती स्वयंभू आहे. मंदिरात चैत्रोत्सव, नवरात्र, विजयादशमी हे मोठे उत्सव साजरे केले जातात आणि देशभरातून भाविक या काळात देवीच्या दर्शनासाठी येतात.

रामायणातही या गडाचे उल्लेख आहेत. दंडकारण्याचा एक भाग असलेल्या या गडावर लढाईत लक्ष्मण जेव्हा बेहोश झाला तेव्हा त्याला पुनः जागृत करण्यासाठी हनुमानाने याच गडावर येऊन संजीवनी वनस्पती नेली असाही समज आहे.

Leave a Comment