माहूरगड- रेणुकामातेचे शक्तीपीठ

mahur
आज घटस्थापना. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथेही नवरात्राची धामधूम सुरू झाली आहे. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई ही अन्य दोन शक्तीपीठे असून सप्तश्रृंगीची जगदंबा हे अर्धे पीठ मानले जाते. याशिवाय अंबोजोगाईची योगेश्वरी आणि औंधची यमाई हीही शक्तीपीठे मानली जातात. शिवाची पत्नी सती हिने अग्नीत उडी घेतल्यानंतर तिच्या देहाचे भाग भारतभरात ५१ ठिकाणी विखुरले गेले व ती सारी स्थळे शक्तीपीठे म्हणून मानली गेली आहेत. नवरात्रानिमित्ताने माहूर येथे सरासरी ५ लाखांहून अधिक भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. मोठी यात्रा भरते. माहूर हे रेणुकामातेचे स्थान तसेच ते देवी अनुसुया, दत्तात्रेयांचेही स्थान आहे. माहूरचा मुस्लीम भाविकांचा सोन्यापीर दर्गाही फार प्रसिद्ध आहे.

माहूरचा उल्लेख मातापूर असाही केला जातो. जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका. आणि त्यांचा पुत्र विष्णुचा अवतार मानला गेलेला परशुराम. क्रोधाविष्ट पित्याच्या आज्ञेवरून परशुरामाने आई रेणुकेचे शिर उडविले ते येथे येऊन पडले असा भाविकांत विश्वास आहे. परशुरामाने पित्याकडून वर मिळवून आईला पुन्हा जिवंत केले अशी कथा सांगितली जाते. येथे रेणुकेचा महाप्रचंड तांदळा आहे. तांदळा म्हणजे मुखवटा. या देवीला तांबूलाचा नैवेद्य दाखविला जातो. म्हणजे ५१,१०१ या प्रमाणात विड्याची पाने घेऊन त्याचा त्रयोदशगुणी विडा तयार करून तो कुटून प्रसाद म्हणून चढविला जातो.

माहूरचे राज्य उदराम देशमुख याच्याकडे होते. याच्यानंतर त्याची राणी पंडिता सावित्रीबाई गादीवर आली. ही अतिशय पराक्रमी आणि निडर होती. तिला औरंगजेबाने रायबाघन असा किताब दिला होता. ही राणी औरंगजेबाच्या बाजूने शिवाजी राजांच्या विरोधात लढली असा इतिहास आहे.

माहूर येथेच दत्तात्रेयांचा जन्म झाला असे मानले जाते. या गडावर दत्तात्रेय, सती अनुसुया, परशुराम, देवदेवेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. गडाचा परिसर रम्य आहे आणि थोड्या अंतरावर एक धबधबाही आहे. राजा उदरामाचा महालही पाहण्यास मिळतो. नवरात्र काळात येथे जाण्यासाठी एस टीची खास सेवाही उपलब्ध करून दिली जाते.

Leave a Comment