दुर्गेच्या ५१ शक्तीपीठातील ९ शक्तीपीठे परदेशात

durgadevi
दुर्गा सप्तशती मध्ये माता सतीची कथा सांगितली गेली आहे. नवरात्रात नऊ दिवस पुजली जाणारी दुर्गा म्हणजेच सती हिने पती शंकराचा अपमान सहन न झाल्याने यज्ञात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले होते. तिच्या मृत्यूने सैरभैर झालेले महादेव तिचे शरीर घेऊन वणवण फिरत होते तेव्हा विष्णुने सुदर्शन चक्राने तिच्या शरीराचे तुकडे केले. ते ५१ विविध ठिकाणी पडले व ही स्थळे म्हणजे माता सतीची शक्तीपीठे म्हणून प्रसिद्धीस आली.

नवरात्रात या शक्तीपीठांचे दर्शन ही फार पुण्याची गोष्ट समजली जाते. या सर्व ठिकाणी नवरात्रात मोठ्या जत्रा यात्रा भरतात. परदेशातही नऊ ठिकाणी ही शक्तीपीठे आहेत त्यांची ही माहिती माझा पेपरच्या वाचकांसाठी.या सर्व ठिकाणी माता सतीची व शंकराची पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते.

durgadevi1
१)गंडकी- नेपाळमधील गंडकी नदीच्या उगम जेथे आहे तेथे हे शक्तीपीठ आहे. माता सतीचा उजवा गाल या ठिकाणी पडला असा समज आहे. येथे देवीला गंडकी नावाने तर महादेवांना चक्रपाणी या नावांनी पुजले जाते.
२)गुहेश्वरी- नेपाळमधील पशुपती मंदिराजवळच गुहेश्वरी मंदिर आहे. येथे देवी सतीचे दोन्ही गुडघे पडले असा समज आहे. येथे सतीला महामाया व शिवाला कपाल नावाने पुजले जाते.
३)हिंगलाज- सध्या पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तानात हिंगोल नदीच्या काठी हे स्थान आहे. हिंगलाज माता मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. येथे सतीचे मस्तक पडले असा समज असून देवी सतीला भैरवी तर शिवाला भीमलोचन या नावाने येथे पुजले जाते.

durgadevi2
४)श्रीलंका- येथे सतीचे पैंजण पडले असा समज आहे. येथे सतीला इंद्राणी व शिवाला राक्षसेश्वर या नावांनी पुजले जाते.
५)मानसरोवर- तिबेटमधील मानसरोवर येथे माता सतीचा उजवा हात पडला असा समज आहे. येथे सतीची दाक्षायणी तर शिवाची भैरव म्हणून पूजा होते.
६)सुगंध- बांग्लादेशातील हे स्थान सुंगध नदीच्या काठी आहे. येथे माता सतीने नाक पडले असा समज आहे. येथे सतीला उग्रतारादेवी या नावाने तर शिवाला यम्बक या नावाने पुजले जाते.

७)करतोया तट- हे ठिकाणही बांग्लादेशातच आहे. भवानीपूर येथे माता सतीच्या डाव्या पायातील पैंजण पडला असा समज आहे. येथे सतीला अपर्णा नावाने तर शिवाला वामन नावाने पुजले जाते.
८)भवानी मंदिर- बांग्लादेशातील चितगांव पासून ३८ किमीवर असलेल्या सीताकुंड स्टेशनपासून जवळ हे ठिकाण आहे. चंद्रशेखर पर्वतावर असलेल्या या भवानी मंदिराच्या ठिकाणी माता सतीचा उजवा बाहू पडला असा समज आहे. येथे सतीची पूजा भवानी रूपात तर शिवाची पूजा चंद्रशेखर म्हणून केली जाते.
९) यशोर- हे स्थानही बांग्लादेशातच असून जसौर शहरात आहे. येथे माता सतीचा डावा हात पडल्याचा समज आहे. येथे सती यशोरेश्वरी नावाने तर शिव चंद्र नावाने पुजले जातात.

Leave a Comment