तुळजापूरची भवानी

tulja
साडेतीन शक्तीपीठापैकी दुसरे स्थान आहे तुळजापूरच्या भवानीमातेचे. सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथे डोंगरावर वसलेले हे मंदिर १२ व्या शतकातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुलाची ही कुलदेवता. शिवाजी राजांना अफझलखानाबरोबर झुंज घेण्यासाठी याच देवीने भवानी तलवार भेट दिली होती असे इतिहास सांगतो. शिवाजी राजे भवानी मातेचे निस्सिम भक्त होते.

तुळजा भवानीची आणखी दोन मंदिरे आहेत. पैकी एक तुळजामंदिर १५३७ ते ४० या काळात चितोडगड येथे बांधले गेले तर दुसरे पटणाकुवा गांधीनगर, गुजराथ येथे आहे. तुळजाभवानी १४ व्या शतकात येथे आली आणि येथे राहिली असा भाविकांचा विश्वास आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहेत.

तुळजापूर भवानीचे उल्लेख स्कंद पुराणापासून सापडतात. कर्दम नावाच्या संतपुरूषाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी अनुभूती हिने तपस्या सुरू केली व आपल्या तान्ह्या अपत्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी तुळजा भवानीवर टाकली. अनूभूतीचा तपस्या भंग करण्यासाठी कुकुर नावाचा राक्षस आला तेव्हा भवानीने त्याच्याशी युद्ध करून त्याचा नाश केला. याच देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचाही वध केला. त्यामुळे ती महिषासूर मर्दिनी म्हणूनही ओळखली जाते. तुळजा भवानीच्या मंदिराला दोन मुख्य द्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार सरदार निंबाळकर प्रवेशद्वार असून आतील दोन महाद्वारे राजा शिवाजी व राजमाता जिजाऊ महाद्वारे म्हणून ओळखली जातात.

भवानीची मूर्ती स्वयंभू म्हणजे आपोआप निर्माण झालेली असून ती अष्टभूजा आहे. देवीच्या हातात अनेक शस्त्रे आहेत तसेच एका हातात महिषासूराचे मस्तकही आहे. मंदिराच्या आवारात अनेक देवांची छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस एक वाटोळा दगड असून त्याला चिंतामणी म्हटले जाते. या चिंतामणीवर दोन्ही हात अलगद ठेवून मनातली इच्छा बोलायची. मनीषा पूर्ण होणार असेल तर चिंतामणी उजव्याबाजूने फिरतो आणि कौल देतो. इच्छापूर्ती होणार नसेल तर चिंतामणी डाव्या बाजूने फिरतो असा भाविकांचा समज आहे.

हे देवस्थान जागृत मानले जाते. येथे अजबळी देण्याची प्रथा असून दरवर्षी १० हजाराहून अधिक अजबळी येथे दिले जातात. मंदिरात विविध पूजा केल्या नित्यनेमाने केल्या जातात. प्रातःपूजा, मध्यानपूजा, सायंपूजा आणि शेजारती रोज केली जाते. नवरात्राचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आणि राज्यातून तसेच देशभरातूनही देवीचे भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.

Leave a Comment