करोनामुळे ४० टक्के डॉक्टर मनोरुग्ण: इंडियन मेडिकल असोसिएशनचा दावा

मुंबई: करोनाच्या महासाथीने सर्वसामान्य नागरिकांना भयभीत केले असतानाच ‘करोना योद्धा’ म्हणून सन्मानित केल्या जाणाऱ्या डॉक्टरांमध्येही या महासाथीने भयाचे वातावरण निर्माण केले आहे. राज्यात कोविड-१९ वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी ४० टक्के निवासी डॉक्टर मानसिक रुग्ण झाले असून डॉक्टरांमध्ये मद्यप्राशन आणि धूम्रपानाच्या व्यसनांमध्ये ३० टक्क्याने वाढ झाली असल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे.

करोना रुग्णांवर उपचार करणारे अतिदक्षता विभागातील २५ टक्के डॉक्टर आणि फिजिशियन तणावग्रस्त असून त्यांना नैराश्य घालविण्यासाठी औषधें घ्यावी लागत आहेत. या तणावामुळे डॉक्टरांनाही मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेणे आवश्यक झाल्याचे डॉक्टरांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे.

राज्यात अनेक डॉक्टर आणि नर्स सलग सहा महिने आपले कुटुंब आणि घर यापासून दूर राहून करोनाच्या रुग्णांवर उपचार करीत आहेत. महासाथीची भीती आणि कुटुंबियांबियांपासून वियोग यामुळे ते मानसिक रोगांचे बळी ठरल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे.

बरेच डॉक्टर्स आपल्या कार्यमग्न आणि तणावपूर्ण कार्यशैलीमुळे कधीतरी मद्यप्राशन आणि धूम्रपान करतात. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे डॉक्टरांवरील तणावात अनेक पटीने वाढ झाली आहे. विशेषतः अतिदक्षता विभागात काम कारणारे डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स यांच्यापैकी कित्येक जण सलग ६ महिने घर आणि कुटुंबापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक आजार आणि व्यसनाधीनता वाढत आहे, असे असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.