करवीरवासिनी अंबाबाई

amba
साडेतीन शक्तीपीठातील महत्त्वाचे पीठ मानले जाणारे करवीर म्हणजे कोल्हापूर हे उत्तर काशी म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. करवीरची महालक्ष्मी अंबाबाई केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंचगंगेच्या पावन तीरावर वसलेल्या या शहरातील अंबेचे मंदिर १२ व्या शतकातील आहे. चालुक्य राजघराण्याच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर अतिशय वैशिष्टपूर्ण वास्तुकलेचा उत्तम नमुना समजले जाते. मंदिराला चार द्वारे आहेत आणि येथील अंबेची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. अंबेच्या शीरावर शिवमंदिरही आहे.

मंदिर समुहात गणेश, नवग्रह, विष्णु, विठ्ठल, दत्त अशा अनेक देवांची मंदिरे आहेत. असा समज आहे की तिरूमला बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईचे कोल्हापूरात येऊन दर्शन घेतले नाही तर बालाजी दर्शन पूर्ण होत नाही. विष्णू आणि महालक्ष्मी यांचा या नगरात कायमचे वास्तव्य आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.

महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आहे. तीन फुट उंचीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून मंदिराच्या एका भिंतीवर श्रीयंत्र कोरले आहे. देवीच्या मूर्तीमागे तिचे वाहन सिह आहे. एका हातात महाळुंग फळ, एका हातात कौमुदकी, एका हातात पानपत्र आणि एका हातात खेटक किवा ढाल अशी ही मूर्ती असून तिच्या मुकुटात शेषनाग आहे. दररोज देवीची दिवसातून पाच वेळा पूजा अर्चा केली जाते.

येथेही नवरात्राचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आणि लक्षावधी लोक अंबेच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात किरणोत्सवही साजरा होतो. दरवर्षी २१ मार्च आणि २१ सप्टेंबरला सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या प्रथम पावलांवर आणि शेवटी मुखावर येतात. मंदिराच्या आवारात मनकर्णिका कुंडही आहे. तिरूपतीने पद्मावतीशी लग्न केल्याने अंबा रागावून तिरूपतीमधून कोल्हापूरात येऊन राहिली अशी कथा सांगितली जाते. दरवर्षी नवरात्रात तिरूमलाकडून एक शालू देवीला पाठविला जातो.

जाणकारांच्या मते ही विष्णुची लक्ष्मी नाही तर शंकराची पार्वती म्हणजे दुर्गा आहे.

Leave a Comment