आद्रवासिनी लेहडा देवी

ardradevi
उत्तरप्रदेशातील महराजगंज या भागात पवाह नदीकाठी असलेले आद्रवासिनी लेहडा देवीचे स्थान हे शक्तीपीठातील एक असल्याचे मानले जाते व या ठिकाणी नेपाळसह अनेक देशातून लाखो भाविक नवरात्रात दर्शनासाठी येत असतात. मनापासून आणि भक्तीभावाने व्यक्त केलेल्या मनोकामना ही देवी पूर्ण करते असा भाविकांचा विश्वास आहे. गोरखपूरपासून ५१ किमी अंतरावर हिमालयाच्या कुशीत जंगलाच्या आच्छादनात हे स्थान वसलेले आहे. ऐतिहासिक महत्त्वाच्या या मंदिराच्या संबंध थेट महाभारत काळाशी जोडलेला आहे. असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासातील बराचसा काळ येथे व्यतीत केला होता व भीमाने या देवी मंदिरातील पिंडी स्थापन केलेली आहे.

ardradevi1
अशीही कथा सांगतात की देवी अतिशय सुंदर तरूणीचे रूप घेऊन नदी नावेतून पार करत होती तेव्हा नावाड्याला तिच्या रूपाचा मोह पडला व त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देवी विलक्षण रूपात प्रकट झाली तेव्हा नावाडी घाबरला व तिची क्षमा मागून त्याने दयेची भीक मागितली. देवीनेही नावाड्यावर कृपा करताना तिच्या दर्शनासाठी येणारे भाविक नावाड्याची आठवण कायम ठेवतील असा वर दिला. या मंदिराच्या पूर्व दिशेला नावेवर देवीची प्रतिमा स्थापन केली गेली आहे. येथे नारळ व ओढणी हाच मुख्य प्रसाद असतो व देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी नारळ व चुनरी अर्पण केली जाते.

गुप्त काळात भारतात आलेल्या चीनी प्रवाशांनीही त्यांच्या प्रवासवर्णनात या देवी मंदिराचा उल्लेख केलेला आहे. शारदीय तसेच चैत्री नवरात्रात येथे मोठा उत्सव होतो तेव्हा भाविकही प्रचंड संख्येने देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

Leave a Comment