तुम्हीही एवढ्या लाखात विकत घेऊ शकता दाऊद इब्राहिमची जमीन


मुंबई – भलेही पाकिस्तानमध्ये राहून मोठी संपत्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गोळा करत असेल पण त्याची भारतात असलेली संपत्ती मात्र आता विक्रीच्या मार्गावर असून आतापर्यंतची दाऊद इब्राहिमशी संबंधित संपत्तीची ही सर्वात मोठी विक्री असणार आहे. यांसदर्भातील वृत्त स्क्वेअरफीटने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या संपत्तीचा लिलाव स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्सकडून (SAFEMA) होणार आहे. ई-लिलाव, टेंडर तसेच सार्वजनिक लिलावाच्या माध्यमातून १० नोव्हेंबरला या संपत्तीची विक्री होईल.

ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, दाऊदच्या या संपत्तीचा आम्हाला याआधीच आम्हाला लिलाव करायचा होता, पण कोरोनामुळे हा लिलाव आम्हाला लांबणीवर टाकावा लागला होता. आम्हाला यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले आहे. हा लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

२ नोव्हेंबरला लिलावात बोली लावणारे संपत्तीची पाहणी करु शकतात. स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्सकडे ६ नोव्हेंबरला ४ वाजण्याआधी अर्ज पोहोचणे गरजेचे आहे. त्याचबरोबर डिपॉझिटही जमा करावे लागणार आहे. १० नोव्हेंबरला ई-लिलाव, टेंडर तसेच सार्वजनिक अशा तिन्ही प्रकारे लिलाव होणार आहे.

त्याचबरोबर दाऊदचा जवळचा माणूस म्हणून ओळखला जाणारा इक्बाल मिर्ची याच्याही मुंबईतील दोन संपत्तीचा लिलाव होणार आहे. सांताक्रूझमधील मिल्टन अपार्टमेंटमध्ये इक्बाल मिर्चीच्या नावे दोन फ्लॅट असून त्यांची विक्री होणार आहे. सोसायटीमध्ये असणाऱ्या रेकॉर्डनुसार दोन्ही फ्लॅटचा एरिया १२४५ स्क्वेअर फूट एवढा असून ३ कोटी ४५ लाख एवढी या दोन्ही फ्लॅटची राखीव किंमत ठेवण्यात आली आहे. स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्सने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नागपाडा येथील दाऊदच्या बहिणीच्या नावे असणारा ६०० स्क्वेअर फूट फ्लॅट १ कोटी ८० लाखांना लिलावात विकला होता.

अशी हा दाऊद इब्राहिमची लिलाव होणारी संपत्ती
२७ गुंठे जमीन – राखीव किंमत २.५ लाख
२९.३० गुंठे जमीन – राखीव किंमत २.२३ लाख
२४.९० गुंठे जमीन – राखीव किंमत १.८९ लाख
२० गुंठे जमीन – राखीव किंमत १.५२ लाख
१८ गुंठे जमीन – राखीव किंमत १.३८ लाख
घर क्रमांक १७२ आणि २७ गुंठे जमीन – राखीव किंमत ५.३५ लाख
याशिवाय लोटे गावात ३० गुंठे जमीन आहे ज्याची राखीव किंमत ६१.४८ लाख ठेवण्यात आली आहे.

ही संपत्ती रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील कुंबके गावात आहे.