ट्विटरने ब्लॉक केले डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट


नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने जोरादार झटका दिला असून ट्रम्प यांच्या प्रचाराचे ट्विटर अकाऊंट ‘टीम ट्रम्प’ अस्थायी स्वरुपासाठी ब्लॉक करण्यात आले आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांच्या मुलाची वैयक्तिक माहिती ट्विट करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केले.

ट्रम्प यांच्या प्रचाराचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी टीका केली आहे. ट्विटरची प्रचार अकाऊंटवरील कारवाईनंतर ट्विटरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने लोकांनी ट्विटरबद्दल रोषदेखील व्यक्त केला. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे ट्विटरच्या नियमांविरोधात आहे. ट्रम्प यांना ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंटवर जर पोस्ट करायच्या असतील तर तो व्हिडीओ डिलीट करावा लागेल, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली.


जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडनच्या युक्रेनमधील व्यवसायाबद्दल माहिती देणारा व्हिडीओ डोनाल्ड ट्रम्प यांच्या @TeamTrump या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. जो बायडन खोटे आहेत आणि ते कित्येक वर्षापासून देशाला धोका देत असल्याचे कॅप्शन देखील व्हिडीओसोबत दिलेले होते. संबंधित व्हिडीओ टीम ट्रम्पकडून पहिल्यांदा डिलीट करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळी पुन्हा ट्विट करण्यात आला. हा व्हिडीओ आम्ही पुन्हा पोस्ट करत आहोत, जो ट्विटर तुम्हाला दाखवू इच्छित नसल्याचे कॅप्शन दिले होते.