… यामुळे सीबीआय थांबवणार नाही सुशांत प्रकरणाची चौकशी


नवी दिल्ली – दररोज काही ना काही वेगळे वळण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला मिळत असताना सीबीआयकडे एम्स रुग्णालयामधील टीमने अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. हत्येचा दावा पूर्णपणे या रिपोर्टमध्ये फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एम्सच्या या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सीबीआयने ही शक्यता फेटाळून लावली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सुशांत प्रकरणाची चौकशी सुरुच राहील अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी दिली.

सुशांतच्या हत्येचा दावा एम्स रुग्णालयामधील टीमने दिलेल्या रिपोर्टनुसार फेटाळण्यात आला. परंतु अद्याप सीबीआयला या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत. त्याचबरोबर सुशांत आत्महत्येसाठी प्रवृत्त का झाला होता? याचेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्यामुळे अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय हे प्रकरण बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण आर. के. गौर यांनी दिले. सुशांतच्या चाहत्यांनी त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे समाधान व्यक्त केले आहे.

सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी एम्स रुग्णालयाकडून प्रयत्न सुरु होता. डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम यासाठी तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत.