मुंबईत दाखल झाला मास्क न घातल्याप्रकरणी पहिला गुन्हा


मुंबई : मास्क न घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे. मुंबई महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्या एका बेजबाबदार नागरिकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आता विनामास्क फिरणाऱ्यांवर मुंबई महापालिका कठोर कारवाई करत असून मुंबईतील राहुल मधुकर वानखेडे नावाच्या 28 वर्षीय तरुणाविरोधात बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती मास्कविना फिरत होता. महापालिकेच्या पथकाने त्यावेळी त्या व्यक्तीला रोखून मास्क न घातल्याने विचारणा केली. परंतु त्याने कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची आणि उद्धट उत्तरे दिल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कलम 186 आणि कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजारांच्या पार पोहोचली आहे. तर 9 हजार 500 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईसह राज्यभरात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिकेने मास्कबाबत “नो मास्क नो एंट्री” हे अभियान राबवले आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर बीएमसीने 200 रुपयांचा दंडाची तरतूद केली आहे. परंतु मास्क न वापरण्याचे प्रमाण जास्त दिसू लागले तर दंडाची रक्कम वाढवण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

आतापर्यंत मास्क न घालणाऱ्या 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर मुंबई महापालिकेने कारवाई करुन एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दंडाची रक्कम वसूल केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली. 200 रुपये दंड सध्या मास्क न घालणाऱ्यांसाठी आकारला जातो. पण जर असेच मुंबईकर बेशिस्त राहिले तर दंडाची रक्कम वाढवण्याचा विचार होऊ शकतो, असेही सुरेश ककाणी म्हणाले.

साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 च्या कलम 3, अंतर्गत दिलेले आदेश न पाळल्यास दंडाची कारवाई करण्याची तरदूत आहे. यामध्ये कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली जाते. या गुन्ह्यात ठरविक काळासाठी तुरुंगावास जो एक महिन्याचा असू शकतो किंवा 200 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. काही प्रकरणात दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात.