ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची कन्हैय्या कुमार यांनी घेतली भेट


मुंबई : ठाकरे सरकारमधील एका मोठ्या मंत्र्यांची जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कन्हैय्या कुमार यांनी ठाण्यात भेट घेतली. जवळपास 20-25 मिनिटे कन्हैय्या कुमार हे जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात होते. या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी ही भेट बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

बिहार निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्याच्या झालेल्या या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर एरव्ही प्रसारमाध्यमांशी स्वत: हून बोलणारे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांनी यावेळी बोलणे टाळले आहे. दरम्यान, कन्हैय्या कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांचा प्रचार कन्हैय्या कुमार यांनी केला होता.