प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण


बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली असून या संदर्भातील माहिती कुमार सानू यांचा मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी दिली आहे.

गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने कुमार सानू अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरात जाणार होते. पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. त्यांना मुंबई महानगरपालिकेने होम क्वारंटाईन होण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने एक वृत्त वाहिनीला दिली.

अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरामध्ये कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली सना आणि एना हे राहतात. जवळपास प्रत्येक महिन्याला कुमार सानू त्यांना भेटायला जात होते. पण जानेवारीनंतर कोरोनाचा धोका वाढल्याने त्यांना अमेरिकते जायला मिळाले नाही. त्यानंतर या महिन्यात जात होते, पण जाता आलेले नाही. कुमार सानू यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कोरोना झाल्याची पोस्ट करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनी लवकर बरे व्हा अशी प्रार्थना केली आहे.