रात्री ११.३० पर्यंत खुले राहणार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेकडून शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट आणि बार सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत, तर सकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत अन्य व्यापारी आस्थापना खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे सर्व कारभार ठप्प झाले. कालांतराने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारने दिलेल्या आदेशांच्या आधारे मुंबईमधील भाजी बाजार, बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट, बार एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मुंबईमधील या आस्थापना त्यानुसार सुरू करण्यात आल्या आहेत.

त्यानंतर आता या आस्थापनांच्या वेळेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. ही बाब लक्षात घेत आता महानगर पालिकेकडून मुंबईतील हॉटेल, रेस्तराँ, फूड कोर्ट, मद्यालये सकाळी ७ ते रात्री ११.३० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत अन्य व्यापारी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले.

कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रांमधील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन बंधनकारक आहे. राज्य सरकार आणि पालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५’मधील कलम ५१ ते ६० आणि ‘भारतीय दंड संहिता, १८६०’मधील कलम १८८ आणि लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा इक्बाल सिंह चहल यांनी या आदेशात दिला आहे.