लष्करप्रमुख नरवणे यांना मिळणार ‘जनरल ऑफ नेपाळ आर्मी’ सन्मान

फोटो साभार मातृभूमी

भारताचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांना नेपाळच्या नियोजित दौऱ्यात नेपाळ सरकार ‘ जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ ही मानद रँक देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. नेपाळ आणि भारत या दोन देशातील मजबूत सैन्य संबंधाची ओळख म्हणून हा परंपरागत सन्मान दिला जातो. भारत सरकार सुद्धा असा सन्मान नेपाळ लष्कर प्रमुखाना देत असते. मात्र सध्या नेपाळ आणि भारत याच्यात सीमा वादावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या राष्टपती विद्यादेवी भंडारी जनरल नरवणे यांना या सन्मानाने गौरविणार असल्याचे त्याला विशेष महत्व दिले जात आहे.

जनरल नरवणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. असा सन्मान देण्याची सुरवात १९५० साली झाली आहे. जनरल नरवणे नेपाळ दौऱ्यात तेथील सेना प्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा व संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांच्या बरोवर महत्वाची चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. वास्तविक हा दौरा ३ फेब्रुवारी २०२० लाच होणार होता पण कोविड मुळे लॉकडाऊन सुरु झाल्याने तो स्थगित केला गेला होता.

दरम्यान नेपाळ सरकारने भारत सरकारचा कैलास मानसरोवर मार्ग नेपाळ हद्दीतून जात असल्याचा आरोप करून वाद सुरु केला आहे मात्र भारताने हा आरोप साफ फेटाळून लावला आहे. या वादानंतर लष्कर प्रमुखांचा हा पहिलाच नेपाळ दौरा होत आहे.