चाळीशी पन्नाशीतील महिला आणि विस्मरण

महिला साधारण चाळीशीत पाहोचल्या की त्यांना अनेक प्रकारचे त्रास होत असतात. चाळीशीपुढचा काळ हा महिलांसाठी मेनॉपॉझचा काळ असतो. ४० ते ५० वयादरम्यान येणारा हा काळ महिलांना अनेक दृष्टीने त्रासाचा असतो पण त्यातही मानसिक अस्वस्थता हा त्यातील सर्वात मोठा भाग असतो. या वयोगटातील महिलांना प्रामुख्याने जाणविणारा विस्मरण होण्याचा प्रकार हा प्रत्यक्षात खरा असतो असे आता नवीन संशोधनातून सिद्ध झाले आहे. मेनापॉझच्या पहिल्या कांही वर्षात हा त्रास अधिक तीव्र स्वरूप धारण करतो असेही या संशोधनातून आढळले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरमधील मेरियम वेबर यांनी हे संशोधक केले आहे.

यात ४० ते ५० वयोगटातील ११७ महिलांना समाविष्ट करून घेण्यात आले होते व त्यांच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात असे आढळले की ज्यांचा मेनापॉझ पिरीयड सुरू झाला आहे अशा महिलांना विस्मरणाचा त्रास अधिक होत होता. क्षणापूर्वी काय बोललो, कोणती वस्तू घेण्यासाठी आपण एखाद्या जागी आलो हे त्यांना विसरायला होत होते. तसेच नवीन कोणतीही गोष्ट शिकणे, ती लक्षात ठेवणे आणि त्याचा योग्यवेळी उपयोग करणे हेही त्यांना त्रासदायक होत होते. विशेषतः ड्रायव्हिंग कौशल्ये आत्मसात करणे त्यांना अवघड जात होते.

या काळात शरीराच्या कोणत्याही अवयवात अचानक उष्णता उत्पन्न होणे, विस्कळीत झोप व त्यामुळे येणारे डिप्रेशनही या महिलांत आढळले. यामागे मेंदूतील ज्या भागात या क्रियांचे केंद्र असते तेथे इन्स्ट्रोजेन हे हार्मोन्स कमी प्रमाणात मिळणे हे मुख्य कारण आहे आणि मेनापॉझच्या काळात महिलांमधील हे महत्त्वाचे हार्मोन कमी होत असते हेही यात आढळले. अर्थात वेबर यांच्या मते ही सारी लक्षणे कांही काळापुरतीच दिसतात आणि ती तात्पुरत्या स्वरूपाची असतात. याच काळात योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केले गेले तर त्यावर मात करता येते.

Leave a Comment