रिलायन्स स्मार्ट इलेक्टिक मीटर उद्योगात उतरणार

फोटो साभार ट्विटर

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी जिओ आणि रिलायन्स रिटेल मध्ये प्रचंड यश मिळविल्यावर आता जिओ पेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात खपणाऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी काम करत आहेत. रिलायन्सचा हा सर्वात मोठा प्रकल्प असेल आणि त्यातही यश मिळाले तर भारताच्या प्रत्येक घरात रिलायन्सचे हे उत्पादन दिसेल असे सांगितले जात आहे. जगातील मोठ्या प्रकल्पात सामाविष्ट असलेल्या स्मार्ट इलेक्ट्रिक मीटरना यापूर्वीच केंद्राने मंजुरी दिली आहे. आता रिलायन्स या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी सिद्ध झाले आहे.

रिलायन्स स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर डेटा, कम्युनिकेशन कार्ड, टेलिकॉम व क्लाउड होस्टिंग सर्व्हिस, पॉवर होस्टिंग कंपन्यांना पुरविणार आहे. यातही जिओचा प्लॅटफॉर्म महत्वाची भूमिका बजावेल. जिओ प्लॅटफॉर्म ही सेवा नॅरो बँड इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे एनबीआयओटीच्या माध्यमातून पुरविण्याचा विचार करत आहे. हे एक लो पॉवर वाईड एरिया तंत्रज्ञान आहे, जे नव्या आयओटी डीव्हायसेस व सर्व्हिस ला वेगळ्या पद्धतीने एकमेकांशी जोडते.

स्मार्ट मीटर रिचार्ज करून वीज वापर करता येतो. म्हणजे प्रीपेड फोन प्रमाणेच हे काम होते. ग्राहक जेवढ्या रुपयाचा चार्ज करेल तेवढी वीज वापरू शकतो. चार्ज संपला की पॉवर ऑफ होते व रिचार्ज केले की पुन्हा सुरु होते. देशात विजेची कमतरता आणि वाढता खप यावर उपाय म्हणून केंद्राने अगोदरच नेहमीचे इलेक्ट्रिक मीटर हटवून त्याजागी स्मार्टमीटर लावले जावेत असे आदेश दिले आहेत.