पुरुष मंडळीनो, महिलांची अक्कल काढताना विचार करा

तुला काय कळतंय? नको तिथे अक्कल पाजळू नका. हा संवाद बहुतेक घरातील महिला वर्गाच्या परिचयाचा असतो. वर्षानुवर्षे महिला हा संवाद ऐकत आल्या आहेत. मात्र आता यापुढे हे वाक्य म्हणताना पुरुषांनी किमान दहा वेळा विचार करायला हवा. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये असे समोर आले आहे, की पुरुषांना ४३ वर्षांचे झाल्यावर अक्कल किंवा प्रगल्भता येते तर महिलांना पुरुषांच्या अकरा वर्षं आधीच अक्कल येते. साधारण वयाच्या ३२ व्या वर्षी महिलांमध्ये प्रगल्भता येते. त्यामुळे कोणाला किती कळते हे नक्कीच सिद्ध झाले आहे.

महिला साधारणतः पुरुषांच्या वागण्यावर बालिशपणाचे आरोप करतात. संशोधकांनी या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे म्हटले आहे.
यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक दहापैकी ८ महिलांच्या बोलण्यात पुरूषांचे वागण बालिश वाटत असल्याचे आले आहे.. पुरुषांच्या वागण्यात बरीच वर्षं काहीही बदल होत नाही. लहान मुलांसारख्या आवडी-निवडी असणं हे पुरुषांच्या बालिशपणाचे लक्षण आहे. व्हिडिओ गेम खेळणं आणि फास्ट फूड खाणं यांसारख्या क्रिया करताना पुरुषांमधील बालिशपणा प्रकर्षाने जाणवत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

डेली मेल मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भांडण केल्यावर रुसून बसणं, स्वयंपाक होत असताना उतावळेपणा करणं, अश्लील विनोदांवर खो खो हसणं, बेदरकारपणे गाडी चालवणं हे सर्व बालिशपणा न गेल्याचे लक्षण मानले जाते.

महिलांच्या उत्तरांमधून असे दिसून आले आहे की महिलांना अशा पुरुषांची लहान मुलांसारखी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आता संशोधकांनी पुरुषांचा विकास धीम्या गतीने का होतो, याचे संशोधन सुरू केले आहे.

Leave a Comment