टेलीबॉय, दुसऱ्या महायुद्धातला बॉम्ब निकामी करताना फुटला

पोलंड मध्ये दुसऱ्या महायुद्ध काळात टाकला गेलेला सर्वात मोठा बॉम्ब निकामी करताना त्याचा स्फोट झाला व त्यामुळे धरणीकंप झाल्यासारखी जमीन थरथरली तर समुद्रात त्सुनामी सारख्या लाटा उसळल्या असल्याचे समजते. टेलीबॉय असे या अजस्त्र बॉम्बचे नाव होते आणि ब्रिटीश रॉयल एअरफोर्सने दुसऱ्या महायुद्धात या बॉम्बचा वापर केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सप्टेंबर मध्ये पोलंडच्या स्वाईनझोक्सी शहराबाहेर पाईस्ट कालव्यात तो मिळाला होता पण तो फुटलेला नव्हता. त्यामुळे हा बॉम्ब निकामी करण्याचे काम पोलंड नौसेनेचे पाणबुडे करत होते. त्यापूर्वी हा सर्व परिसर रिकामा केला गेला होता. या भागातून ७५० नागरिकांना अन्यत्र हलविले गेले होते.

डेली मेलच्या बातमीनुसार मंगळवारी नौसेना पाणबुडे पाण्याखाली हा बॉम्ब निकामी करण्यासाठी उतरले होते. पण त्यापूर्वीच त्याचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट प्रचंड मोठा होता पण पाणबुडे अगोदरच सुरक्षित अंतरावर असल्याने मनुष्यहानी झाली नाही. या बॉम्बचे वजन ५४०० किलो होते आणि त्यात २४०० किलोची स्फोटके होती.