चिमणीने केले वर्ल्ड रेकॉर्ड, नॉनस्टॉप कापले १२ हजार किमी अंतर

फोटो साभार भास्कर

बार टेल्ड गॉटविक जातीच्या चिमणीने न थांबता ११ दिवस सतत उड्डाण करून १२ हजार किमीचे अंतर कापून जागतिक रेकॉर्ड केले आहे. अलास्का ते न्यूझीलंड हे अंतर या चिमणीने काहीही न खाता पिता आणि क्षणाचीही विश्रांती न घेता पूर्ण केले. तिला ट्रॅक करण्यासाठी तिच्या मागच्या भागात सॅटेलाइट टॅग लावला गेला होता. या चिमण्या अलास्का भागातच आढळतात आणि त्या स्थलांतर करून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मध्ये जातात.

पक्षी स्थलांतर संशोधक वैज्ञानिक डॉ. जेसी कॉक्लीन यांनी या बाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, या पक्षाचे शरीर लढाऊ विमानाप्रमाणे असते. लांब आणि लवचिक पंख असल्याने त्यांची हवेत उडण्याची क्षमता प्रचंड असते. ही चिमणी १६ सप्टेंबर रोजी अलास्का भागातून उडाली आणि २७ सप्टेंबर रोजी न्यूझीलंड मधील ऑकलंड येथे पोहोचली. ताशी ८८ किमी वेगाने तिने हा प्रवास केला. उडताना या चिमणीचे शरीर आकुंचित होते. उड्डाण करण्यापूर्वी ही चिमणी दोन महिने सतत किडे आणि अन्न सेवन करत होती पण उड्डाणा दरम्यान मात्र तिने काहीही खाल्ले नाही.

यापूर्वी अलास्का आणि न्यूझीलंड हे अंतर एका फिमेल शोरबर्डने २००७ साली पूर्ण करून रेकॉर्ड केले होते. आत्ताच्या उड्डाणासाठी २० चिमण्यामधून चार चिमण्या निवडल्या गेल्या होत्या. या चिमणीचे सरासरी वजन २३० टे ४५० ग्राम असते. पंखांची रुंदी ७० ते ८० सेंटीमीटर असते असेही समजते.