कुत्र्याचे जिणे हवे रे बाबा !

कुत्र्याची मौत येणे हा शब्द प्रयोग आपणास परिचित आहे तसेच कुत्र्याचे जिणे म्हणजे अगदी हलाखीचे आणि हाड हाड करून घेऊन जगणे असाही त्याचा अर्थ आपल्याला माहिती असतो. पण हेच जगणे झुलिक नामक कुत्र्यासारखे असेल तर ? झुलीक कोण म्हणून काय विचारता ? अहो हा कुत्राच आहे पण तब्बल १० लाख डॉलर्सचा मालक असलेला कुत्रा आहे.

कुणी कुणाचे नशीब सांगू शकत नाही ही उक्ती या झुलीक महाशयानी अगदी सार्थ ठरविली आहे. त्याची कथा एखाद्या सिनेमात शेाभेल अशीच आहे. दुसर्याथ महायुद्धानंतर अमेरिकेला स्थलांतर केलेला फायडोरोव्ह नावाचा इसम मुळचा बेलारूसचा. ही कथा १९५० सालची. त्यावेळी त्याच्याकडे  असेच एक कुत्रे होते अगदी त्याच्या जिवाला जीव देणारे. हा फायडोरोव्ह २००७ साली पुन्हा बेलारूसला गेला तेव्हा त्याच्या कुत्र्याच्या आठवणीने तो अगदी व्याकुळ झाला. कारण अमेरिकेला येताना आजारी असलेल्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते पण तो खर्च करण्याऐजवी तेच पैसे अमेरिकेच्या तिकीटासाठी वापरणे फायडोरोव्हला योग्य वाटले. कुत्रा मरण पावला पण फायराडोव्हच्या मनातून ते शल्य मात्र गेले नाही. तेव्हाच आपल्या मूळ गावातून आणखी एक कुत्रे आणण्याचा निश्चय त्याने केला आणि झुलीकला आणले.

झुलीकचा मूळ मालक व्हॅसिली सांगतो, फायरोडोव्हने झुलीकच्या नावावर बँक खाते काढले आणि आज त्या खात्यात तब्बल ९९,७०० डॉलर्सची रक्कम आहे. फायरोडोव्हही देवाघरी गेला मात्र त्याच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे झुलीकला स्वतंत्र आलिशान खोली, मोठ्या बेडसह देण्यात आली. त्यात प्लाझ्मा टिव्हीही बसविला आहे. दिवसांतून तीन वेळा अर्धा किलो मटणासह सकस आहार त्याला दिला जातो. दोन वेळा मोकळ्या हवेत फिरायला नेले जाते आणि दिवसातून दोन वेळा अभ्यंग स्नानही घातले जाते.

झुलीकला वर्षातून एकदा परदेशवारी घडविली जाते तीही त्याच्या इच्छेनुसार. म्हणजे त्याच्यापुढे जगाचा नकाशा ठेवला जातो आणि तो ज्या देशावर आपला पंजा ठेवेल तिकडे त्याला प्रवासासाठी नेले जाते. यंदाच्या जुलैत झुलीकची परदेशवारी ड्यू आहे आणि त्याचा मालक व्हॅसिलीला असे वाटते आहे की तो यंदा पॅरिसवर आपला पंजा उमटवेल. मग काय आहे नां मजा!

Loading RSS Feed

Leave a Comment