BARC कडून वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला तीन महिन्यांसाठी स्थगिती


मुंबई – टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (BARC) मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर बार्कने तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार असल्याचे बार्कने निर्णय जाहीर करताना सांगितले आहे.

न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून (NBA) बार्कच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. योग्य दिशेने बार्कने पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया एनबीएकडून देण्यात आली आहे. आपल्या पूर्ण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी १२ आठवड्यांचा अवधी तसेच देशात काय पाहिले जाते यासंबंधी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी वापरावा असे मत बार्कने व्यक्त केले आहे.


मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवणाऱ्या वाहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा केला आहे. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.