यावर्षीचा जेजुरीतील मर्दानी दसरा ‘कोरोना’मुळे रद्द !


पुणे – यंदाचा नवरात्र व दसरा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिरात साधेपणाने व परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे. पण, श्रींचा पालखी सोहळा, खंड (मर्दानी दसरा) स्पर्धा, राज्यातून येणारे कलावंत व वाघ्या मुरळी यांची हजेरी, दसरानिमित्त मानपान/रोख मानधन, भजन, पूजन, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.

गेल्या सहा- सात महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. तर आता ते नवरात्र उत्सवातही बंद राहणार असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मंदिरातील पुजारी, नित्य वारकरी, सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजा व नवरात्र उत्सवातील पूजाअर्चा होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी स्पष्ट केले आहे.