रशियाची कोरोना प्रतिबंधक दुसऱ्या लसीला मान्यता


बुधवारी ‘एपिवॅककरोना’ या लसीला मान्यता दिल्याची घोषणा रशियाने केली असून मान्यता देण्यात आलेली ‘एपिवॅककरोना’ ही रशियातील दुसरी लस आहे. ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. जगात कोरोना लसीला अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया पहिला देश आहे.

दरम्यान रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन माझ्याकडे चांगली बातमी असून वेक्टर सेंटरने कोरोनावरील एपिवॅककरोना या दुसऱ्या लसीची नोंदणी केल्याचे ते म्हणाले. एपिवॅककरोना लसीची निर्मिती सायबेरीयातील वेक्टर इन्स्टि्टयूटने केली आहे. मागच्या महिन्यात या लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील मानवी चाचण्या पूर्ण झाल्या. अद्याप या चाचण्यांचे रिपोर्ट प्रसिद्ध झालेले नाहीत. या लसीची अजून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी बाकी आहे.

एपिवॅककरोनालाही स्पुटनिक व्ही प्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यातील चाचणीनंतर मान्यता देण्यात आली. आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या लसीचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. लसीसंदर्भात मित्र राष्ट्रांना आम्ही सहकार्य करत असल्याचे पुतिन सरकारी वाहिनीवर प्रसारीत केलेल्या संदेशात म्हणाले.

एपिवॅककरोना लसीची चाचणी नोव्होसीबर्स्कमध्ये १८ ते ६० वयोगटातील फक्त १०० स्वयंसेवकांवर घेण्यात आली. नोव्होसीबर्स्क स्थित वेक्टर सेंटरने दुसऱ्या लसीची नोंदणी केली आहे. एपिवॅककरोना आणि स्पुटनिक व्ही मध्ये फरक असून अ‍ॅडीनोव्हायरसवर स्पुटनिक व्ही बनवलेली लस आहे तर पेपटाइडपासून बनवलेली एपिवॅककरोना लस असल्याचे रशियन सरकारकडून सांगण्यात आले.

४० हजार लोकांवर ‘स्पुटनिक व्ही’ या रशियातील पहिल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. एपिवॅककरोनाची तिसऱ्या टप्प्याची हजारो स्वयंसेवकांवर चाचणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरु होईल. हे वृत्त तास न्यूज एजन्सीने दिले आहे. ३० हजार स्वयंसेवकांवर एपिवॅककरोनाची चाचणी होईल. त्यात सायबेरियातील ५ हजार लोकांवर चाचणी होईल. आणखी एक लस रशियाच्या सेंट पीट्सबर्गमधील च्युमाकोव्ह इन्स्टिट्यूट विकसित करत आहे. या लसीचा वापर लवकरच सुरु होईल असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितले. रशियात येत्या १९ ऑक्टोंबरपासून या तिसऱ्या लसीची चाचणी सुरु होईल. पहिल्या टप्प्यातील या चाचणीत ३०० स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.