पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 36 लाखांची वाढ


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती 30 जून 2020 रोजी एकूण संपत्ती 2.85 कोटी रुपये एवढी झाली असून त्यांच्या सपत्तीत 2019 च्या तुलनेत यंदा तब्बल 36 लाखांनी वाढ झाली आहे. पंतप्रधानांसह सर्व कॅबिनेट मंत्र्यांनाही आता संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकीकडे मोदींची संपत्ती वाढली तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांना शेअर बाजारातील चढ-उतारामुळे मोठा फटका बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती मागच्या वर्षी 2.49 कोटी रुपये होती. मोदींची संपत्ती अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि शेअर बाजारातही चढ-उतार असताना कशी वाढली? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. बँका आणि अनेक इतर सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांची संपत्ती वाढली आहे. त्यांना बँकांमधून तब्बल 3.3 लाख परतावा मिळाला आहे. तर इतर साधनांमधून 33 लाख रुपये मिळाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे यंदाच्या जून महिन्याच्या अखेरीस रोख रक्कम फक्त 31,450 रुपये होती. त्यांच्याकडे गांधी नगरमध्ये NSC ब्रँचच्या SBI खात्यामध्ये 3,38,173 रुपये जमा आहेत. या खात्याच्या एफडीआर आणि एमओडीमध्ये त्यांचे 1,60,28,939 रुपये जमा आहेत. डाक विभागात त्यांनी नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटमध्ये (NSC) तब्बल 8,43,124 रुपये जमा केले आहेत. जीवन विमा पॉलिसीमध्ये 1,50,957 रुपये आणि टॅक्स सेव्हिंग्स इन्फ्रा बॉन्डमध्ये 20,000 रुपये लावले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण जंगम मालमत्ता 1.75 कोटी रुपये आहे.

कोणतेही कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले नाही. एकही गाडी किंवा इतर वाहन त्यांच्या नावावर नाही. मोदींकडे तब्बल 45 ग्रॅम सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. मोदींकडे संयुक्त मालकीचा गांधीनगरच्या सेक्टर-1 मध्ये तब्बल 3531 चौरस फुटांचा एक प्लॉट आहे. 4 लोकांच्या संयुक्त नावावर हा प्लॉट असून उर्वरित तिघांची 25-25 टक्के भागिदारी आहे. 25 ऑक्टोबर 2002 ला ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या 2 महिने आधी याची किंमत फक्त 1.3 लाख रुपये होती. पण आता मोदींच्या एकूण स्थावर संपत्तीची किंमत 1.10 कोटींवर गेली आहे.