ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा


बंगळूरु पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबई येथील घरी छापा टाकला असून बंगळूरु पोलीस दुपारी एक वाजता विवेकच्या घरी पोहोचले आणि त्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याचा तपास पोलीस करत आहेत. बंगळूरुतील ड्रग्ज कनेक्शनमध्ये तो आरोपी आहे.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अमली पदार्थ प्रकरणात बंगळुरू पोलीस कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आदित्य अल्वाचा विवेक ओबेरॉय हा नातेवाईक आहे. विवेक ओबेरॉयच्या घरी आदित्य हा लपला असावा अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरात धडक दिल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.