अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा विशेषाधिकार भंग केल्याची नोटीस


मुंबई : विधिमंडळ सचिवालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दुसऱ्यांदा विशेषाधिकाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत, याबाबत तातडीने खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. विधानसभेतील कार्यवृत्त विधानसभा अध्यक्षांच्या परवानगी शिवाय सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने विशेषाधिकाराचा भंग झाल्याचे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य मंत्र्यांबाबत अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी रिपब्लिक टीव्हीवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभाध्यक्षांकडे विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना सादर केली होती. यावर, अर्णब गोस्वामी यांच्या विरुद्ध विशेषाधिकार भंग का करण्यात येऊ नये, अशी नोटीस विधानसभाध्यक्षांनी १६ सप्टेंबरला पाठविली होती.

विधानमंडळ सचिवालयाने या नोटीसीसोबत गोस्वामी यांना विधानसभेचे कार्यवृत्त देखील पाठविले होते. त्यात विधानसभेच्या नियमानुसार हे कार्यवृत्त गोपनीय असून विधानसभाध्यक्षांच्या परवानगीविना त्याचा न्यायालयीन कामकाजासाठी आणि इतर कोठेही वापर करता येणार नाही, असे कळविण्यात आले होते. तरीही हे कार्यवृत्त गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करून विधानसभेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले.

याबद्दल गोस्वामी यांना मंगळवारी विधानमंडळ सचिवालयाने एक नोटीस जारी केली आहे. त्यांचा या संदर्भातील लेखी खुलासा १५ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी विधानसभाध्यक्षांकडे पाठवावा, असे नोटीसीत नमूद केले आहे. तसेच, ५ ऑक्टोबरपर्यंत विधीमंडळ सचिवालयाने पाठविलेल्या पहिल्या नोटीसीचा खुलासा सादर करण्यास सांगितले. तो अद्यापही गोस्वामी यांनी केलेला नाही. २० ऑक्टोबरपर्यंत खुलासा न आल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा सचिवालयाने दिला.