‘पीएम केअर्स फंड’ला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून १५७ कोटींचे दान


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून १५७.२३ कोटी रुपयांचे दान देण्यात आले आहे. तर या निधीपैकी ९३ टक्क्यांहून अधिक निधी रेल्वे विभागाने दिला आहे. यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत इंडियन एक्स्प्रेसने मागितलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

रेल्वे मंत्रालय पीएम केअर्स फंडाला दान देण्यात सर्वात आघाडीवर असून पीएम केअर्सला या विभागातून १४६.७२ कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. रेल्वेने माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना म्हटले की, पीएम केअर्स फंडाला कर्मचाऱ्यांच्या योगदानाच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. सर्वाधिक निधी देण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी अंतराळ विभाग आहे. ५.१८ कोटी रुपयांचे योगदान या विभागाने दिले आहे. या विभागाने म्हटलं की, व्यक्तिगत स्वरुपात कर्मचाऱ्यांनी दिलेले हे योगदान त्यांच्या वेतनातून देण्यात आले आहे.

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या आरटीआय अर्जाला अनेक प्रमुख विभाग जसे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), गृह मंत्रालय तसेच भारतीय पोस्ट विभाग यांसारख्या मोठ्या विभागांनी उत्तर दिलेले नाही. यापूर्वी देखील फंडाला किती निधी दान स्वरुपात मिळाला याची सविस्तर माहिती देण्यास पीएम केअर्स फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या पीएमओने नकार दिला होता.

पीएमओने आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले होते की, ‘पीएम केअर फंड’ हे आरटीआय कायद्याच्या कलम २ (एच) नुसार सार्वजनिक प्राधिकरण नाही. पण पीएम केअर फंडाबाबत काही माहिती त्यांची वेबसाईट pmcares.gov.in वर दिसू शकते.