मेड इन इंडिया बाईक चालविणार टॉम क्रुझ

मिशन इम्पॉसिबल या लोकप्रिय चित्रपटाच्या सातव्या भागात टॉम क्रुझ मेड इन इंडिया बीएमडब्लू जी ३१० बाईकवर स्टंट करताना दिसणार आहे. हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझ सध्या मिशन इम्पॉसिबल चित्रपटाच्या सातव्या भागाचे शुटींग करण्यात व्यग्र असून त्याच्या चाहत्यांना या अॅक्शन पॅक्ड चित्रपटाची खूप प्रतीक्षा आहे. या चित्रपटात नेहमीप्रमाणेच अतिवेगवान थरारक पाठलागाची दृश्ये असतील आणि त्यात कोणत्या कार्स आणि बाईक्स पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे टॉम क्रुझ सर्व अॅक्शन स्टंट डुप्लिकेट न घेता स्वतः करणार आहे. इटली मध्ये सुरु असलेल्या शुटींग मध्ये टॉम क्रुझ बीएमडब्ल्यू जी ३१० चालविताना पाहायला मिळाला आहे. ही बाईक भारत व अन्य आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी भारताच्या होसूर येथील टीव्हीएसच्या प्रकल्पात उत्पादित केली जाते.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकली असून ते लिहितात ‘ मेक इन इंडिया, मिशन इम्पॉसिबल मिशन पॉसीबल बनवीत आहे. टॉम क्रुझ भारतात बनलेली बाईक चालविताना पहा.’ ही बाईक इटालियन पोलीस पेट्रोलिंग साठी वापरतात. विविध कलर स्कीम, अॅलर्ट लाईट्स आणि साईड पॅनीअर्स अशी फिचर तिला दिली गेली आहेत.