शेवटी जमवून घेणे महत्वाचे

सध्याचा जमाना लव्ह मॅरेजेस्चा आहे. म्हणजे होणार्‍या विवाहांमध्ये बरेचसे विवाह प्रेमातून साकार झालेले आहेत. सगळेच विवाह असे नाहीत. परंतु मुला-मुलींनी परस्परांना पाहून किमान एक-दोनदा भेटूनच विवाह पक्का केला जातो. केवळ एकदा चहा आणि कांदापोहे यांचा आस्वाद घेत आई-वडील भाऊ-बहीण या सर्वांसमोर नाव,  शिक्षण असे जुजबी प्रश्न विचारून त्यातूनच पसंती देऊन लग्न करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.

पूर्वी तर यापेक्षा वेगळा प्रकार असायचा. कित्येक लग्नांमध्ये मुलाने मुलीला आणि मलीने मुलाला पाहिलेलेच नसायचे. त्यांची पहिली नजरानजर आणि भेट लग्नातच होत असे. आई-वडिलांनी आपली सून पसंत केलेली असे आणि ती आपल्या मुलासाठी योग्य आहे असे मुलाला कळवलेले असे. मुलगाही ते मान्य करत असे. मुलीला तर पसंती विचारण्याचा प्रश्नच नव्हता.

अशा प्रकारच्या विवाहाविषयी आताची मुले आश्चर्य व्यक्त करतात. परस्परांना पाहिलेले नाही, एकमेकांशी चर्चा केलेली नाही, स्वभाव जाणलेले नाही असे असतानाही जन्मभराची गाठ बांधण्यास तयार व्हायचे हा प्रकार म्हणजे मागासलेपणाचे लक्षणच असे आता आजची मुले म्हणत असतात. एकमेकांची भेट झाली पाहिजे, परस्परांना जाणून घेतले पाहिजे, विचार जुळले पाहिजेत तरच लग्न करावे असे या नव्या पिढीचे म्हणणे असते आणि त्यांच्या दृष्टीने असे परस्परांना जाणून घेण्यासाठी निदान वर्ष दोन वर्षांचा तरी सहवास असावा, असे त्यांचे प्रतिपादन असते.

पण प्रश्न असा निर्माण झाला आहे की, एका किवा दोन वर्षाच्या सहवासात तरी दोघे एकमेकांना चांगले ओळखू शकतात का? प्रेम विवाह केलेल्या अनेकांना याबाबत प्रश्न विचारले असता आपल्या डेटिंगच्या काळात सुद्धा आपण परस्परांना फार ओळखू शकलेलो नाही, असे त्यांनी मान्य केले. एवढेच नव्हे तर विवाह होऊन २५ वर्षे उलटली तरीही कित्येक पती-पत्नींनी एकमेकांना नीट जाणलेले नसते.

महाराष्ट्रातले एक थोर विचारवंत वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांनी एका भाषणात ही कबुली दिली होती. वयाच्या ६० व्या वर्षी म्हणजे विवाहानंतर ३५ वर्षांनी ते पत्नीसह विमान प्रवास करत होते. पत्नीसाठी तो पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे ती घाबरलेली होती आणि त्या अवस्थेत ती आपल्या पतीला एवढी बिलगून बसली होती की, शिवाजीराव भोसले यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘त्या बिलगण्यातून मला आयुष्यात पहिल्यांदा माझ्या पत्नीसाठी मी काय आहे हे प्रथमच उमगले’.

अशी अवस्था असेल तर प्रेमविवाह करणारे प्रेमवीर आपण परस्परांना चांगले ओळखून मगच विवाह करत असतो अशी बढाई मारतात ती बढाई तकलादू वाटते. अर्थात एका भेटीपेक्षा प्रेमविवाहात एकमेकांची अधिक ओळख होते हे मान्यच केले पाहिजे. परंतु प्रेमविवाहात दोघे एकमेकांना फार ओळखू शकतात असे काही म्हणता येत नाही.

एकंदरीत प्रेमविवाह असू द्या की दोन-भेटींच्या शेवटी झालेला अॅरेंज्ड विवाह असो एकमेकांना ओळखण्याची सतत गरज असते आणि ही ओळखण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जीवन जगताना सुरू राहते. या ओळखण्यामध्ये दोघांनीही परस्परांना समजून घेणे, स्वीकारणे आणि आपल्या जोडीदारासाठी आपल्या स्वभावाला मुरड घालणे हे अधिक आवश्यक आहे. परस्परांसाठी काही तरी त्यागण्याची वृत्ती आणि दोघांच्या मध्ये असलेला विश्वास हाच वैवाहिक सुखाचा आधार असतो. मग हे समर्पण आणि विश्वास कोणत्याही प्रकारच्या विवाहातून निर्माण झालेला असो.

Leave a Comment