शतायुषी होण्यामागचे रहस्य

longlive

माणूस किती वर्षे जगू शकतो आणि तो किती वर्षे जगला पाहिजे, याविषयी खूप चर्चा होत असते मात्र तूर्तास तरी माणसाला १२५ वर्षांच्या पुढे आयुष्य मिळू शकणार नाही, असे समजले जाते. ज्ञात इतिहासात तरी सर्वाधिक जगलेला माणूस १२५ वर्षे जगलेला आहे. कधी कधी यापेक्षा अधिक जगलेल्या लोकांच्या काही बातम्या प्रसिद्ध होत असतात. मात्र त्यांच्या जन्मतारखांचे वाद असतात. आजपासून सव्वाशे वर्षांपूर्वी निदान अशिक्षित समाजात तरी जन्माच्या तारखा व्यवस्थित लिहून ठेवण्याची सोय नव्हती. त्यामुळे अशा लोकांच्या दाव्यांविषयी शंका उपस्थित केल्या जातात. 

आता रशियाजवळील जॉर्जिया या देशातील एका महिलेचा मृत्यू झाला. ती १३२ वर्षांची होती, असा तिचा दावा होता. अॅन्टिसा चिचावा असे तिचे नाव. तिच्या जन्माच्या अधिकृत नोंदी उपलब्ध नसल्यामुळे तिच्या या दीर्घ जीवनाला तज्ज्ञांनी मान्यता दिली नाही. तिच्या मुलाच्या जन्माच्या नोंदी मात्र लिहिलेल्या आहेत आणि त्याचे वय ७२ वर्षे आहे. या महिलेचे १३२ हे वर्ष मान्य केले तर तिला हा मुलगा साठाव्या वर्षी झाला हे मान्य करावे लागते. मात्र असे होणे शक्य नाही. तिच्या मते मात्र तिला हा मुलगा साठाव्या वर्षी झालेला आहे. 

ही बाई वयाच्या ८५ व्या वर्षांपर्यंत चहाच्या मळ्यात काम करत होती. तिचे वय १३२ होते की नाही हा वाद आपण सोडून देऊ. परंतु ती प्रदीर्घ काळ जगलेली होती हे मान्यच केले पाहिजे. तिने आपल्या हयातीमध्ये आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना, दररोज थोडी ब्रॅन्डी पिणे हेच रहस्य असल्याचे सांगितले. ती बाई दीर्घायुषी होती हे खरे, परंतु ती ब्रॅन्डी पिल्यामुळे एवढी जगली यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. ती शंभरापेक्षा अधिक वर्षे जगली, पण तिच्या दीर्घायुष्याचे शास्त्रीय कारण तिला माहीत नव्हते. 

भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे ९९ वर्षे जगले. त्यांना त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले असता त्यांनी सांगितले, ‘शिवांबू’. शिवांबू म्हणजे स्वतःचे मूत्र. मोरारजी झोपेतून उठल्यानंतर स्वतःचीच ग्लासभरून लघवी पीत असत. ते शिवांबू प्राशन करत असत आणि ते दीर्घायुष्यी होते या दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. पण त्यांच्या दीर्घायुष्याच्या कारणांविषयी ते स्वतः अनभिज्ञ होते. ब्रिटनचा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ९४ वर्षे जगला. त्याला त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले असता तो म्हणाला, ‘माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य सिगारेट ओढणे.’ अशा काही गोष्टी समोर आल्या की, अनेक गैरसमज निर्माण होतात. मात्र मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा लोकांच्या दीर्घायुष्याचे खरे कारण असते जबरदस्त इच्छाशक्ती. विल पॉवर.

 

Leave a Comment