लिलावात बहिरी ससाण्याला मिळाली कोटींची किंमत

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे बहिरी ससाण्यांचा लिलाव ३ ऑक्टोबर पासून सुरु झाला असून जगभरातून या लिलावासाठी ससाणा प्रेमी रियाध येथे दाखल झाले आहेत. मंगळवारी येथे एका ससाण्याला १७३२८४ डॉलर्स म्हणजे तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमत मिळाली. सौदी फाल्कन क्लब तर्फे या लिलावाचे आयोजन मुलहम राजे अब्दुल अझीज फेस्टिव्हल मैदानात करण्यात आले आहे.

१५ नोव्हेंबर पर्यंत म्हणजे ४३ दिवस हा लिलाव सुरु राहणार आहे. १ कोटी २७ लाख रुपयांची किंमत ही आत्तापर्यंत मिळालेल्या किमतीत विक्रमी आहे. देश विदेशातून शेकडो ग्राहक या लिलावासाठी जमले असले तरी करोना मुळे मर्यादित संख्येनेच ग्राहकांना परवानगी दिली जात आहे. मैदानाचा परिसर २ हजार चौरस मीटर असूनही हे मैदान ग्राहकांना अपुरे पडत आहे.

या लिलावात पाहिला लिलाव युवा शाहीन श्रेणीतील ससाण्यांचा केला गेला. त्यात पहिला ससाणा २१,४८,५१८ रुपयांना, दुसरा ससाणा २४,४१,९५३ रुपयांना तर तिसरा १४,६५,१७१ रुपयांना विकला गेला. या लिलावाचा मुख्य हेतू व्यापार आणि व्यवसाय याना प्रोत्साहन मिळावे आणि त्यामुळे गुंतवणुकीच्या संधी वाढाव्या हा आहे. या निमित्ताने ससाणे शौकिनांची संख्या वाढावी असा ही प्रयत्न केला जात आहे.