भूगर्भशास्त्राचा प्रगत अभ्यास

ज्वालामुखी कसे तयार होतात? या पृथ्वीतला वरचे डायनॉसोर गेले कुठे? ही पृथ्वी गरम होत आहे म्हणजे नेमके काय? अशा प्रश्‍नांची उत्तरे भूगर्भ शास्त्रात शोधली जातात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे भूगर्भशास्त्राचा (जियालॉजी) अभ्यास महत्वाचा ठरत आहे. हे शास्त्र पृथ्वीच्या जडणघडणीशी निगडित आहे. पृथ्वीची रचना आणि तिच्यासाठी उपयोगात आलेली सामुग्री यांचा व्यापक अभ्यास या शास्त्रात केला जातो. भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक उत्पातांचाही अभ्यास या शास्त्रात होतो. पृथ्वीच्या पोटातील तेल आणि खनिजे यांचा अभ्यासही याच शास्त्रात मोडतो. या शास्त्राचा अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांचा मानवी जीवनाच्या किती तरी क्षेत्रांशी संबंध येत असल्याने या शास्त्राची पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नोकरी, व्यवसाय आणि संशोधन अशा कितीतरी संधी उपलब्ध असतात.

नैसर्गिक संकटांचा आगाऊ अंदाज करणे, पर्यावरणाचे रक्षण, हवामानाचा अंदाज वर्तवणे, निसर्गाने दिलेल्या साधन सामुग्रीचा कमाल वापर होईल असे नियोजन करणे, जमिनीची उत्पादकता टिकवणे, जमिनीचा वापर वाढवणे, खाणी आणि प्रदूषित विभागांचे पुनरुज्जीवन करणे, टाकावू पदार्थ्यांची विल्हेवाट अशी किती तरी कामे या शास्त्राशी निगडित आहेत. त्यावरून या क्षेत्रात किती रोजगार संधी उपलब्ध असतील याचा अंदाज येतो.

या शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या अभ्यासाची पार्श्‍वभूमी आवश्यक आहे. बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या बी.एस्सी. (जियॉलॉजी) पदवीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेता येतो. काही विद्यार्थ्यांना पदव्युतर पदवीही घेता येईल. पण तसे करताना त्यांना भूगर्भशास्त्रातल्या एका शाखेत प्राविण्य मिळवावे लागेल. हा अभ्यासक्रम करताना या क्षेत्रात खूप काम करावे लागते याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. या शास्त्राच्या कामाचा परीघ समुद्राच्या तळापासून पर्वताच्या सर्वोच्च शिखरापर्यंत आहे. खाणकाम आणि तेल उत्खनन करणार्‍या कंपन्यांकडून या शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सतत मागणी असते. लष्करी आणि निमलष्करी दलांनाही हे पदवीधर लागतात. या पदवीधरांना सल्लागार संस्थाही सुरू करता येईल. सरकी मुंबई आणि खरगपूरच्या आयआयटीमध्ये या शिक्षणाची सोय आहे. चेन्नईचे अण्णामलाई आणि हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ यातही भूगर्भशास्त्राच्या प्रगत अभ्यासाठी सोय आहे.

Leave a Comment