पर्यावरण शास्त्रातील करीयर

आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाकडे जरा नजर टाका. त्यात तुम्हाला किती तरी करीयर संधी आपोआप दिसायला लागतील. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे. कारखाने वाढत आहेत त्यातून बाहेर पडणार्‍या विषारी वायूंनी हवेला प्रदूषित केले आहे. या प्रदुषणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी अनेक तज्ज्ञांची गरज आहे. प्रदूषण आणि पर्यावरण रक्षण हा विषय केवळ हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाशी संबंधित नाही. वीज निर्मितीमुळे होणारे प्रदूषण, शेतीतून होणारे प्रदूषण आणि शहरातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे प्रदूषण असेही विषय याच शास्त्रांशी संबंधित आहे. प्रदूषण न घडवणारे तंत्रज्ञान ही या प्रत्येक क्षेत्राची गरज आहे. त्यामुळे या प्रत्येक क्षेत्रात पर्यावरण तज्ज्ञ अपरिहार्य झाला आहे आणि त्याची मागणी वाढली आहे.

केन्द्र सरकारने या गोष्टीची दखल घेतली असून अनेक महाविद्यालयांना हा विषय सक्तीचा केला आहे. या महाविद्यालयात पर्यावरण शास्त्राचे शिक्षण घेतलेले शिक्षकही मिळत नाहीत. तिथे पर्यावरण शास्त्राच्या पदवी धारकांना आणि पदव्युत्तर पदवी मिळवणारांना चांगली संधी आहे. हे शास्त्र किती प्रकारच्या विज्ञान शाखांशी निगडित आहे हे पाहिले म्हणजे ते किती व्यापक आहे याची कल्पना येते.

प्राणी शास्त्र, वनस्पती शास्त्र, रसायन, जल, ऑटोमोबाईल एवढेच नव्हे तर सामाजिक शास्त्राचाही या नव्या शास्त्राशी संबंध आहे. पर्यावरण शास्त्राचे एक तत्त्वज्ञानही आहे. सरकारने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम व्यापक केले आहे.तिथे अनेक रोजगार संधी (अगदी  सरकारी  नोकरीच्या) निर्माण होणार आहेत. शहरातल्या टाकावू कचर्‍याची विल्हेवाट लावणे हाही पर्यावरणाचाच प्रश्‍न आहे पण ती लावताना त्यातून वीज निर्मिती करणे किंवा त्याचा कंपोष्ट खत तयार करणे शक्य असते. अशा कामातही सरकारी नोकरीप्रमाणे महानगर पालिका आणि नगर पालिकांत नोकर्‍या निर्माण होणार आहेत.  सरकारने पर्यावरण रक्षणाचा विचार गांभीर्याने घेतला असेल तर यापुढे प्रत्येक कारखान्याला स्वत:ची प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. कदाचित प्रत्येक साखर कारखान्यात असा एक अधिकारी नेमला जाणार असेल तर तिथे  किती तरी रोजगार संधी निर्माण होतील. अशा अनेक संधी पर्यावरण शास्त्राच्या विद्यार्थ्यांची वाट पहात आहेत. सध्या ज्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यात पदवीधरांना १५ ते ३० हजार दरमहा वेतन मिळत आहे. पदव्युत्तर पदवी मिळवणार्‍यांना सरकारी नोकर्‍यांत आता ३५ ते ५० हजार वेतनाची नोकरी मिळू शकत आहे. या क्षेत्रातल्या नोकर्‍या चांगल्या आहेत पण हे क्षेत्र अजून म्हणावे तसे विकसित झाले नसल्याने करीयर मध्ये अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

शिक्षण देणार्‍या काही संस्था अशा आहेत. आंध्र विद्यापीठ विशाखापटणम, (आंध्र प्रदेश), अण्णा मलाई युनिव्हर्सिटी, अण्णा मलाई (तामिळनाडू), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मल्लेश्‍वरम, बंगलूर (कर्नाटक). या संस्थांची संकेत स्थळे खालील प्रमाणे आहेत. www. andhrauniversity.info, www.annamalaiuniversity.ac.in, www.iisc.ernet.in .

Leave a Comment