पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये – शिवसेना


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावर दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे दुर्दैवी असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत, मग मंदिरे काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विट करत विचारला. दरम्यान शिवसेना महिला आघाडी त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेविरोधात आक्रमक झाली आहे.

आम्ही तोंड उघडले तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नसल्याचे शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या, माजी मुख्यमंत्र्याच्या त्या पत्नी आहेत. त्याच भूमिकेत त्यांनी राहावे. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेना पक्षाची आदित्य ठाकरेंसोबत ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचे हे शिकवू नये आणि आमचे तोंड उघडू नका. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडले तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.