संजय राऊतांच्या खांद्यावर बंदुक ठेवून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला दिलेल्या उत्तरावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मंदिर उघडण्याचा विषय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रातून मांडताना हिंदुत्वाची उद्धव ठाकरेंना आठवण करुन दिली. उद्धव ठाकरे यांनी त्यावर माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे म्हणत उत्तर दिले. भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा अशी टीका केली आहे.


यासंदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. यावरुन उद्धव ठाकरेंना नितेश राणे यांनी यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली. आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी तुम्हाला यावरही उत्तर द्यावेसे वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होते? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, असे म्हटले आहे.