आरेमधील कारशेड कांजुरला हलवणे हा जर बालहट्ट असेल तर पोलिसांची खाती ॲक्सिस बँकेमध्ये वळवण्याला कोणता हट्ट म्हणायचा?


मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजप नेत्यांनी मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. भाजप नेते प्रसाद लाड यांनी आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार असल्याचे म्हणत अप्रत्यक्षरीत्या आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या टीकेला पोलिसांची बँक खाती ॲक्सिस बँकेत वळवल्याचा हवाला देत उत्तर दिले आहे.

मागील काही वर्षांपासून आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडवरून वाद सुरू होता. शिवसेनेने आरेमध्ये मेट्रो कारशेड करण्यास विरोध केला होता. अखेर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार असल्याचे भाजपचे नेते प्रसाद लाड म्हणाले होते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, असे प्रसाद लाड म्हणाले असे मी ऐकले आहे. मग प्रश्न असा आहे की, पोलिसांची सरकारी बँकेतील खाती मागील सरकारच्या काळात खाजगी ॲक्सिस बँकेमध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा?, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत उत्तर दिले आहे.