तनिष्कच्या ‘त्या’ जाहिरातीचे समर्थन करणाऱ्या चेतन भगतवर भडकले नेटकरी


सोशल मीडियात टाटा ग्रुपच्या दागिन्यांचा प्रसिद्ध ब्रँड तनिष्कने केलेल्या एका जाहिरातीवरुन सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हिंदू-मुस्लिम असा संवेदनशील विषय त्यांच्या जाहिरातीत असल्याने तनिष्कला टीकेनंतर आपली जाहिरात मागे घ्यावी लागली. पण तनिष्कच्या या निर्णयावर काही सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचाही यामध्ये समावेश असून या जाहिरातीला त्यांनी पाठिंबा दर्शवत तनिष्कला ट्रोल करणाऱ्यांवर ट्विटरवरुन सडकून टीकाही केली. पण नेटकरी त्यांच्या ट्विटवरुन चांगलेच भडकले आणि त्यांनी भगत यांनाही ट्रोल केले.

आपल्या ट्विटमध्ये भगत यांनी म्हटले की, डिअर तनिष्क तुमच्यावर यासाठी बहुतेक लोक हल्ला करीत आहेत, कारण ते तुमचे दागिने विकत घेऊ शकत नाहीत. या अर्थव्यवस्थेला त्यांची विचारसरणी कुठे घेऊन जाईल हे यावरुन कळते. ते रोजगार नसल्यामुळे नोकरीही करु शकत नसल्यामुळे ते भविष्यातही तनिष्कमधून दागिने खरेदी करण्यास सक्षम असणार नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांची चिंता करु नका.

चेतन भगत यांच्या या ट्विटनंतर नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले. त्यांना प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले की, कोण तनिष्कवर हल्ला करीत आहे. कोणीही त्यांच्या कुठल्याही शोरुमवर दगड फेकलेला नाही. कोणीही त्यांच्या कुठल्याही एक्झिक्युटिव्हला शिवी दिलेली नाही किंवा हल्ला केलेला नाही. ग्राहकांची आपली निवड आहे, ग्राहकांना हक्क आहे बहिष्कार घालण्याचा, जसे तुम्ही तुमच्या मेंदूचा केला लहानपणापासून. त्याचबरोबर एका दुसऱ्या युझरने कॉर्पोरेटला जाहिरात बनवायला पाहिजे पण धर्मामध्ये छेडछाड न करता. तुमच्या जाहिरातीमध्ये ती क्षमता आणि बाब असायला हवी. तसेच आणखी एक युझर म्हणाला की, याला काय माहिती आमच्या पीठ आणि तांदळाच्या डब्यांमध्ये बटाटे-टॉमेटोमाणे सोने आणि पैसे पडून असतात.