राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाप वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांचा पलटवार


मुंबई – आता एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दिक वाद पोहोचला असून आहे. राष्ट्रवादीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना थेट मोदींना लक्ष्य केले होते. आता चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला उत्तर देताना पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.


आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे. दिवसभर शेतात राबणारा शेतकरी आमचा मायबाप आहे. दिवसभर अखंड मेहनत करणारा कामगार आमचा मायबाप आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करूच! आणि राहिला प्रश्न दिल्लीत कोणाचा बाप बसला आहे याचा, तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेले आहे. त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करू नये, जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात. तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी, अशा शब्दात पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.