ICMRची महत्त्वाची माहिती; शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना


नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस असा भारतात निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला १०० दिवसांनंतर पुन्हा कोरोना होण्याचा धोका सर्वाधिक असल्याची माहिती आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण देशात आढळून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भार्गव म्हणाले, कोरोनाच्या पुनर्संसर्गासाठी भारतात १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचे जीवनमान आहे. भारतात अशा प्रकारची पुनर्संसर्गाची तीन प्रकरणे समोर आली असून यातील दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, आयसीएमआरचा डेटा आम्ही तपासत आहोत. त्याचबरोबर पुनर्संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.

दरम्यान, ४५ ते ६० वयोगट असणाऱ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे. आर्थिक घडामोडी सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील रुग्णांना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा तरुण वर्ग हा विचार करतो की आपल्या कमी वयामुळे आपले आरोग्य चांगले आहे, त्यामुळे संसर्ग होणार नाही किंवा ते लवकर बरे होतील. पण लोकांमध्ये असा समज निर्माण होण्यापासून त्यांना रोखले पाहिजे. भारतात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, ८७ टक्के लोक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.