शेती सेंद्रीयच हवी

चित्रपट अभिनेता आमिरखान याने आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतात वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांचा प्रश्‍न चर्चेस घेतला. रासायनिक खते आणि विषारी कीटकनाशके यांच्या भरमसाठ वापराने आपली शेती रासायनिक आणि विषारी झाली आहे. त्या शेतातून उत्पादित होणारे अन्नधान्य, भाज्या, फळे खाल्ल्याने आपल्या प्रकृतीला अपाय होत आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर न करता शेती केली पाहिजे, असा विषय आमिरखानने चर्चेला घेतला. त्याने फारच चांगला विषय हाती घेतलेला आहे आणि तो उत्तमरित्या मांडला सुद्धा आहे. मात्र तासाभराचा कार्यक्रम केल्याने या विषयाचे सगळे पैलू समोर येत नाहीत आणि चर्चिले जाऊ शकत नाहीत. म्हणून या संबंधातल्या काही गोष्टींचा खुलासा करण्याची गरज आहे. जंतुनाशके वापरल्याने आपल्याला अनेक विकार होतात, असे आढळून यायला लागलेले आहेच.

पंजाबमध्ये कीटकनाशकांचा फार वापर होतो. त्यामुळे गव्हामध्ये, भाज्यांमध्ये ही कीटकनाशके उतरलेली असतात. पंजाबच्या एका जिल्ह्यामध्ये तरुण मुलांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तामध्ये शेतात वापरल्या जाणार्‍या तणनाशकांचे अंश सापडले. म्हणजे जंतूनाशके आणि कीटकनाशके यांचे दुष्परिणाम आहेत हे तर निश्‍चित आहे. म्हणूनच यूरोपातले देश भारतातली फळे आयात करताना त्या फळांमध्ये रासायनिक खतांचे अंश उतरलेले नाहीत ना, याची पारख करत असतात. तसे अंश आढळल्यास यूरोपातले ग्राहक ती फळे खरेदी करत नाहीत. भारतात परत पाठवतात. तेव्हा कीटकनाशके नकोतच. मात्र कीटकनाशकविरहित शेती करायची असेल तर आधी रासायनिक खतांना सुट्टी द्यावी लागते. कारण ज्या शेतात रासायनिक खते जास्त वापरली जातात त्या शेतांमध्ये पिकांवर रोग आणि किडी जास्त पडतात. कारण रासायनिक खतांचा वापर वाढला की, शेतातल्या गांडुळांची संख्या मर्यादित होत असते. ज्या शेतात गांडुळ जास्त असतील त्या शेतातील पिकांवर रोगराई कमी पडते. कारण गांडुळ हा मातीच्या आतल्या थरात राहून सतत माती खात राहतो आणि माती खाता खाता मातीतले अनेक किडे आणि जंतू यांचा खातमा करतो. म्हणजे गांडुळ हा शेतातल्या मातीचा दवाखाना असतो. अशा शेतामध्ये रासायनिक खतांचा मारा केला की, गांडुळ मरतात आणि मातीच्या आतील थरातले किडी आणि जंतू मोकाट सुटून पिकांवर पडतात. म्हणूनच अनेक वर्षांच्या निरीक्षणानंतर कृषी शास्त्रज्ञांनी असा निर्वाळा दिलेला आहे की, ज्या शेतात रासायनिक खत जास्त त्या शेतात कीटकनाशकांचा वापर जास्त होतो. म्हणजे कीटकनाशकांचा वापर कमी करायचा असेल तर रासायनिक खते न वापरता सेंद्रीय खते वापरून शेती करावी लागेल. कीटकनाशके नियंत्रित करायची असतील तर शेतीचे तंत्रज्ञान बदलावे लागेल. रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रीय खते वापरावी लागतील.

मात्र सेंद्रीय खतांच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत. ते आधी दूर करावे लागतील. पहिला गैरसमज असा की, सेंद्रीय खतांच्या वापराने उत्पादन कमी होईल. हा खरे म्हणजे गैरसमजच आहे. रासायनिक खताने भरपूर उत्पादन होत असते आणि सेंद्रीय खताने कमी होत असते असा गैरसमज रासायनिक खतांच्या कंपन्यांनी आणि सरकारने मिळून निर्माण केला आहे आणि व्यवस्थित पसरवला आहे. आपल्या देशात रासायनिक खतांचा वापर गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू झाला आहे आणि हळूहळू वाढत गेला आहे. रासायनिक खत वापरेल तो आधुनिक शेतकरी असे आपल्या सगळ्यांच्या मनावर बिंबवले गेले असल्यामुळे आधुनिक शेतकरी होऊन अधिक उत्पादन काढायचे असेल तर रासायनिक खतेच वापरली पाहिजेत, असे सारे जण समजून चाललेले आहेत. पण वस्तुस्थिती तशी नाही. सेंद्रीय खताच्या वापराने रासायनिक खतांच्या बरोबरीने उत्पादन काढता येते. मात्र असे सरसकट आढळत नाही आणि गावखत वापरणार्‍या शेतकर्‍यांचे उत्पन्न कमी असल्याचे दिसते सुद्धा. याचे कारण असे की, सेंद्रीय खत म्हणून शेतकरी जे काही वापरत असतात तो शास्त्रशुद्ध रितीने तयार केलेला नसतो.

शेतामध्ये किंवा घरासमोर उकिरडा नावाचा एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्या घरातला सारा केरकचरा वेडावाकडा टाकलेला असतो. तसाच एक उकिरडा शेतामध्ये सुद्धा असतो आणि त्यात सुद्धा कसली पद्धत न पाळता कचरा टाकलेला असतो. वर्षाच्या शेवटी कधी तरी एकदा हा उकिरडा उकरून शेतामध्ये त्यातला कचरा पसरवला जातो. अशा चुकीच्या पद्धतीने केलेल्या सेंद्रीय किंवा गावखतामुळे उत्पन्न कमीच येते आणि त्यापेक्षा रासायनिक खताचे उत्पन्न जास्त दिसते. जर हा उकिरडा नीट भरला, त्यामध्ये कंपोस्ट किंवा सेंद्रीय खत तयार करताना त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती वापरली तर अशा रितीने तयार झालेला सेंद्रीय खत अधिक उत्पादनाच्या बाबतीत रासायनिक खतापेक्षाही भारी असतो. त्यामुळे रासायनिक खताची आणि सेंद्रीय खताची तुलनाच करायची असेल तर ती करताना सेंद्रीय खत शास्त्रशुद्धरित्या केलेला वापरला पाहिजे. तसा वापर केल्यास खर्च कमी होतो आणि कीटकनाशकांवर होणारे खर्च सुद्धा टळतात.

Leave a Comment